ठाणे : पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा चिनी मांजा, चिनी दोरा, नायलॉन, प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांबरोबरच पक्ष्यांसाठी घातक ठरत असल्याने त्यांच्या जप्तीसाठी ठाणे महापालिकेच्या पथकाने दुकानांमध्ये धाडी सुरू केल्या आहेत. आतापर्यंत एकूण ४५० दुकानांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये चिनी मांजा पथकाला आढळलेला नाही. असे असले तरी या कारवाईत पथकाने एकल वापराचे सुमारे २९० किलो प्लास्टिक जप्त करून १३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्यामुळे मांजा विक्री करणे दुकानदारांना महागात पडण्याची चिन्हे आहेत.
मकर संक्रात सणाच्या काळात पतंग उडविण्यात येते. पतंग उडविण्यासाठी चिनी मांजा, चिनी दोरा, नायलॉन, प्लास्टिक कृत्रिम मांजा वापरला जातो. परंतु हा मांजा हा माणसांबरोबरच पक्ष्यांसाठी घातक ठरतो. यामुळेच केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे. चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारिक चूरा केलेली काच, धातू किंवा अन्य तिक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो. अशा धाग्याचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने निर्बंध घातलेले आहेत. या धाग्याचे जैविकरित्या विघटन होत नसल्याने मल प्रणाली, जलनि:सारण बाधित होते. तसेच असे पदार्थ खाल्ल्याने जनावरांनाही इजा होते. तसेच, हा धागा विद्युत वाहक असल्याने वीज साहित्य आणि वीज उपकेंद्र यांच्यावरही भार येऊन वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर अशा मांजांच्या वापरावर प्रतिबंध करत ठाणे महापालिकेने अशा मांज्याच्या जप्तीसाठी शहरातील दुकानांमध्ये धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, चिनी मांजा तथा सिंथेटिक-नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण आणि वापर टाळण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर तपासणी आणि जप्ती मोहीम नियमितपणे राबविण्यात येत आहे. त्यासाठी, प्रत्येक प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्त स्तरावर कर निरिक्षक, स्वच्छता निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, प्रदूषण नियंत्रण कर्मचारी यांचे दक्षता पथक तयार करण्यात आले आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनाही याविषयी माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत या तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण ४५० आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. असे असले तरी या तपासणीत एकल वापराचे सुमारे २९० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, १३ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच चिनी मांजाची विक्री होत असल्यास ८६५७८८७१०१ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. याशिवाय, pcctmc.ho@gmail.com या इमेलवरही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.