ठाणे : विधानसभा निवडणुक आचारसंहितेच्या दोन दिवस आधी ठाणे पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेला शहराचा सुधारीत प्रारुप विकास योजनेचा आराखड्याबाबत साडेसात हजारहून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. आरक्षण फेरबदल, रस्ते आरक्षण तसेच इतर आरक्षणांसंबंधीच्या तक्रारींचा समावेश असून या तक्रारींवर गुरुवार, आजपासून सुरूवात होणार आहे.

विधानसभा निवडणुक आचारसंहितेच्या दोन दिवस आधी ठाणे पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेला शहराचा सुधारीत प्रारुप विकास योजनेचा आराखडा प्रसिद्ध केला होता. निवडणुकीच्या धामधुमीमुळे हा आराखडा पडद्याआड गेल्याचे चित्र होते. यामुळे सुरूवातीच्या काळात विकास आराखड्याबाबत साडेतीनशे तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. परंतु निवडणुका संपताच आता राजकीय नेते आणि नागरिकांनी या आराखड्याकडे लक्ष केंद्रीत करत तक्रारी नोंदविण्यास सुरूवात केली होती. तक्रारी नोंदविण्यासाठी ११ डिसेंबर २०२४ ही शेवटची मुदत होती. या मुदतीच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या मुदतीत पालिकेकडे साडेसात हजारहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचे स्वरुप लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्रारींचे वर्गीकरण करण्याचे काम पालिकेकडून सुरू होती.

हे काम पुर्ण होताच पालिकेने सुनावणीही जाहीर केली होती. परंतु काही तांत्रिक कारणास्तव ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच पुढील सुनावणीच्या तारखेची ते वाट पाहात असतानाच, पालिका प्रशासनाने सुनावणीची तारीख जाहीर केली आहे. गुरूवार, १३ फेब्रुवारी रोजी विकास आराखड्याच्या तक्रारीवर कशीश पार्क येथील पालिका कार्यालयात सुनावणी होणार आहे.

ठाणे महापालिकेने १९९३ मध्ये शहराचा पहिला विकास आराखडा तयार केला. त्यास राज्य सरकारने २००३ मध्ये मंजुरी दिली. या विकास आराखड्याची १४ टक्केच अंमलबजावणी झाली आहे. प्रस्तावित रस्त्यांची कामे, औद्योगिक क्षेत्र विकासाची कामे जेमतेम ३३ टक्के, व्यावसायिक वापर क्षेत्राचा विकास १८ टक्के तर, रहिवास क्षेत्राचा विकास ६८ टक्के झाला आहे. आराखडय़ाची फारशी अंमलबजावणी झाली नसतानाच, २० वर्षानंतर शहराचा सुधारीत विकास आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी होणार की, जुन्याप्रमाणेच त्याचा बोजवारा उडणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

या आराखड्यामध्ये वाहतुक कोंडी सोडविणे, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उच्च तंत्रशिक्षण, डिजीटल विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य, इन्स्टिट्युट ऑफ केमीकल टेक्नालॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स, सुविधा यासह अध्यात्मिक सुविधा केंद्र आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. वॉटर फ्रन्ट, अर्बन फॉरेस्ट पार्क, सांस्कृतिक केंद्र, सायन्स पार्क, स्नो पार्क, व्हीव्हींग गॅलरी, एक्झबिशन सेंटर, आध्यात्मिक सुविधा केंद्र यासह इतर महत्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्यातील प्रस्तावित रस्ते रुंदीकरणाला घोडबंदर, कळवा भागातील नागरीकांनी रस्ता रुंदीकरणाला विरोध केला आहे. तर नौपाड्यातील नागरीकांच्या रस्ता रुंदीकरण हवे असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

शहराचा सुधारीत प्रारुप विकास योजनेचा आराखड्याबाबत साडेसात हजारहून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारींवरील सुनावणीला आज, गुरूवारपासून सुरूवात होणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक कुणाल मुळे यांनी दिली.

Story img Loader