महापालिका क्षेत्रातील पदपथ अडवून त्यावर भुमाफियांकडून अतिक्रमण केले जात असून अशाचप्रकारे मानपाडा येथील हिरानंदानी मेडोज परिसरातील पदपथ अडवून उभारण्यात आलेली बेकायदा टपऱ्यांवर पालिकेने कारवाई केली. टपऱ्या, हातगाड्या आणि त्यातील साहित्य पालिका प्रशासनाने जप्त केले आहे. त्याचबरोबर बांबूची शेड उभारून बांधण्यात आलेल्या टपऱ्याही तोडण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे या परिसरातील पदपथांनी मोकळा श्वास घेतला असल्याचे दिसून आले. या भागातील एक पानटपरीही तोडून टाकण्यात आली आहे. यामुळे पानटपरीवर येणाऱ्या ग्राहकांमुळे अडविला जाणारा रस्ता मोकळा झाला असून या कारवाईच्या निमित्ताने नागरिकांशी उद्धटपणे वागणाऱ्या त्या टपरीचालकांच्या मुजोरीलाही लगाम बसला आहे.
हेही वाचा >>> कल्याण जवळील म्हारळ येथे छत कोसळून महिलेचा मृत्यू; मुलगी गंभीर जखमी
ठाणे महापालिका क्षेत्रात भुमाफियांकडून मोकळ्या जागांवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. ठाणे शहरापाठोपाठ घोडबंदर भागातील मोकळ्या जागा आणि पदपथांवर भुमाफिया अतिक्रमण करीत आहेत. याबाबत पालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी येऊ लागल्या असून त्यानुसार पालिकेने या तक्रारींच्या आधारे ही बांधकामे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपुर्वी माजीवाडा-मानपाडा भागात पालिकेच्या पथकाने तीन ठिकाणी कारवाई केली होती. त्यात सुरज वॉटर पार्कलगतच्या सेवा रस्त्यावर अचल वाहनांवर होडिंगसाठी उभारण्यात आलेले अनधिकृत लोखंडी साचा गॅस कटरच्या सहाय्याने तोडून टाकण्यात आले होते. ब्रम्हांड येथे अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले शौचालयाचे बांधकाम आणि मनोरमानगर येथे २ वाणिज्य अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आली होती. त्यापाठोपाठ शुक्रवारी सकाळी याच पथकाने हिरानंदानी मेडोज येथील चौकालगतच्या रस्त्यावरील पदपथांवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली आहे. या पदपथावर काही ठिकाणी टपऱ्या उभारण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी बांबूची शेड उभाण्यात १५ टपऱ्या उभारण्यात आल्या होत्या. या शिवाय, हातगाडीही लावण्यात आलेली होती.
हेही वाचा >>> ठाणे : महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य
या अतिक्रमणाबाबत पालिकेकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. तसेच याठिकाणी असलेल्या पान टपरीमुळे रस्त्यावर वाहने उभी केली जात होती आणि त्यामुळे वाहतूकीसही अडथळा निर्माण होत होता. याबाबत विचारणा करणाऱ्या नागरिकांना टपरीवाला उद्धटपणे उत्तर द्यायचा. पदपथाबरोबरच रस्ताही अडविला जात असल्यामुळे नागरिकांकडून माजीवाडा-मानपाडा प्रभाग समितीकडे तक्रारी करण्यात येत होत्या. त्यानुसार सहायक आयुक्त सचिन बोरसे यांच्या पथकाने याठिकाणी जाऊन शुक्रवारी सकाळी ही सर्व बांधकामे हटवून पदपथ मोकळा केला. या कारवाईत टपऱ्या, हातगाड्या आणि त्यातील साहित्य पालिका प्रशासनाने जप्त करण्यात आले तर, बांबूची शेड तोडून टाकण्यात आली.