ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या भुमिगत जलवाहिन्यांमधून होणारी पाणी गळती शोधण्यासाठी पाणी गळती शोध यंत्र (स्मार्ट वाॅटर लिक डिटेक्टर) खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अनेकदा भुमिगत जलवाहिन्यांमधून होणारी गळती शोधण्यासाठी काँक्रीट तसेच डांबरी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई करावी लागते. परंतु या यंत्रामुळे पाणी गळती नेमकी कुठे होत आहे, हे शोधता येणार असल्याने तेवढ्याच भागात रस्ते खोदाई करावे लागणार असून यामुळे रस्ते खोदाई आणि दुरुस्तीवरील खर्चात बचत करणे शक्य होणार आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या घरात गेली आहे. ठाणे शहरात सद्यस्थितीत चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. या स्त्रोतांद्वारे शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांचे जाळे विणण्यात आलेले आहे. या वाहिन्या शहरातील रस्ते आणि जमीनीखालून टाकण्यात आलेल्या आहेत. अनेकदा या भुमिगत वाहिन्यांमधून पाणी गळती होते. या वाहिन्या भुमिगत असल्याने त्यांची गळती नेमकी कोणत्या भागात होते, हे अनेकदा समजत नाही. ही गळती शोधण्यासाठी पालिका प्रशासनाकडून ठिकठिकाणी रस्ते आणि जमिन खोदाई करून भुमिगत वाहिन्यांची गळती शोधण्यात येते. परंतु खोदाईमुळे रस्ते नादुरुस्त होतात आणि त्याच्या दुरुस्तीवर पालिकेला पैसे खर्च करावे लागतात. हे नुकसान टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने आता भुमिगत जलवाहिन्यांमधून होणारी पाणी गळती शोधण्यासाठी पाणी गळती शोध यंत्र (स्मार्ट वाॅटर लिक डिटेक्टर) खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून यासाठी पालिका प्रशासनाने निविदा काढल्या आहेत. या यंत्रामुळे पाणी गळती नेमकी कुठे होत आहे, हे शोधता येणार असल्याने तेवढ्याच भागात रस्ते खोदाई करावे लागणार असून यामुळे रस्ते खोदाई आणि दुरुस्तीवरील खर्चात बचत करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा : राख्यांवर मुख्यमंत्र्यांची छबी… रक्षाबंधनाला राजकीय रंग!
अशी असेल यंत्रणा
स्मार्ट वाॅटर लिक डिटेक्टर यंत्राद्वारे ३ मीटर अंतरापर्यंतच्या भुमिगत जलवाहिन्यांची गळती शोधणे शक्य होणार आहे. काही महिन्यांपुर्वी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हे यंत्र कशाप्रकारे हाताळून पाणी गळती शोधता येते, याची पडताळणी केली होती. मुंब्रा येथील आंबेडकरनगर परिसरातील भुमिगत वाहिनीतून होणारी गळती या यंत्राद्वारे शोधून काढण्यात आली होती. यानंतर पालिकेने हे यंत्र खरेदीचा निर्णय घेतला. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते रुंदीकरण आणि नुतनीकरणाची कामे झाली असून यात जलवाहिन्यांचे स्थलातरित करण्याबरोबरच नवीन जलवाहीन्या टाकल्या आहेत. यामुळे या जलवाहिन्या नेमक्या कुठून कशा गेल्या आहेत, ते शोधण्यासाठी जलवाहीनी लोकेशन डिटेक्टर यंत्रही खरेदी केले जाणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.