ठाणे : महापालिका क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकातील आणि विधवा महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेकरिता १३ हजाराहून अधिक अर्ज पालिकेकडे प्राप्त झाले असून त्यापैकी १० हजार ८८ महिला योजनेकरिता पात्र ठरल्या आहेत. या महिलांना घरघंटी आणि शिलाई यंत्रांचे वाटप करण्यात येणार असून त्याचा पहिला टप्पा आज, मंगळवारी खारेगाव भागात राबविण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिकेच्या समाज कल्याण विकास विभाग आणि महिला बालकल्याण विभागामार्फत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी विविध योजना दरवर्षी राबविण्यात येतात. या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशातून योजना राबविल्या जात असून त्यासाठी घरघंटी, शिवणयंत्र आणि मसाला कांडप यंत्राचे वाटप करण्यात येते. या योजनेकरिता पालिका प्रशासनाकडून शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांकडून अर्ज मागविण्यात येतात. या अर्जांची छाननी करून त्यात पात्र महिलांची यादी तयार करण्यात येते आणि त्यांना योजनेचा लाभ दिला जातो.

हेही वाचा…ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शनात २१७ घरांची विक्री

मुंबई महापालिकेने या योजनेतंर्गत विधवा, परित्यकता, घटस्फोटित, ४० वर्षावरील अविवाहित महिला, गिरणी कामगार, देवदासी, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्रधारक, सर्वसाधारण महिला आणि करोना आजाराने ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे, अशा विधवा महिलांचा समावेश करण्यात आला आहे. याच धर्तीवर ठाणे महापालिकेने योजना राबवावी आणि त्यास ‘धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना’ यांचे नाव देण्याची मागणी तत्कालीन महापौर नरेश म्हस्के यांनी केली होती. ही मागणी मान्य करत पालिकेने योजनेसाठी अर्ज मागिवले होते.

हेही वाचा…कल्याणमध्ये क्रिकेट खेळण्यावरून विद्यार्थ्याला मारहाण

या योजनेकरिता १३ हजार ६३८ अर्ज प्राप्त झाले असून त्यातील १० हजार ८८ अर्ज पात्र झाले आहेत. या महिलांना घरघंटी आणि शिलाई यंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा आज, मंगळवारी खारेगाव भागात राबविण्यात येणार असून यामध्ये खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कळवा, दिवा, मुंब्रा भागातील अडीच ते तीन हजार महिलांना घरघंटी आणि शिलाई यंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation s dharmaveer anand dighe self employment scheme to benefit over 10000 women psg