ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात घराशेजारी, दुकानाबाहेर, चौकात, रस्त्यावर कचरा, राडारोडा, मोडके फर्निचर टाकून अस्वच्छता करण्याबरोबरच शहराच्या सौंदर्याला बाधा आणली जाते. या अस्वच्छतेच्या ठिकाणांची माहिती देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली असून यानंतर खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने आता कचऱ्याची पर्यायी व्यवस्था, लोकसंवाद आणि दंडात्मक कारवाई असा त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी रस्त्यावर, चौकात, रस्त्याच्या कडेला कचरा, गृहसंकुलांच्या बाहेर, बांधकामाचे शिल्लक साहित्य, राडारोडा, मोडके फर्निचर, गाद्या अशा वस्तू टाकलेल्या दिसतात. दैनंदिन कचरा काढला जात असला तरी या ढिगाऱ्यांमुळे अस्वच्छता निर्माण होते. नागरिकांची गैरसोय होते आणि रहदारीलाही अडथला निर्माण होतो. यासंदर्भात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वेळोवेळी अशा ठिकाणांबाबत सूचना देत अस्वच्छतेबदद्ल नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी सायंकाळी कार्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक यांनी आपापल्या क्षेत्रात अशी कचरा टाकण्याची ठिकाणे शोधून काढावीत. तेथे कचरा उचलण्याचा पर्याय द्यावा, तसेच कचरा, राडारोडा टाकू नये याबाबत परिसरातील नागरिक, दुकानदार यांच्याशी संवाद साधावा. त्यानंतरही तेथे कचरा किंवा डेब्रिज आढळ्यास सर्व संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.
स्थानिक समुदायांमध्ये स्वच्छतेविषयी सजग असलेल्यांची फळी तयार करावी. त्यांच्या माध्यमातून लोकसंवाद साधल्यास कचरा टाकण्यास प्रतिबंध होईल. त्यातूनही काही बदल झाला नाही तर संबंधितांवर दंडात्मक कारवाईचा पर्याय राहील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. तसेच, परिमंडळ उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांनी आठवड्यातून दोन दिवस आपापल्या क्षेत्रात सकाळी फेरी मारावी. सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधावा. तसेच, साफसफाई, राडारोडा आदीची पाहणी करून स्वच्छतेचा नियमित आढावा घ्यावा. ही प्रभात मोहीम नियमितपणे सुरू करावी, असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले.
तक्रारींवर तात्काळ कारवाई करा पाणी गळती, नादुरुस्त रस्ते, झाडांच्या फांद्या तोडून टाकणे याबाबत सगळ्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहून त्या गोष्टी संबंधित विभागाच्या निदर्शनास तत्काळ आणून द्यावे. या तक्रारींची ताबडतोब नोंद घेऊन त्यावर कारवाई केली जावी. तुटलेले फुटपाथ, गटारांची मोडकी झाकणे, तुटके दुभाजक यांच्या दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी ही अभियंता विभागाची असून त्यांनी ती कामे तत्काळ करावीत, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.