ठाणे : भिवंडी शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेंतर्गत महापालिकेने बंदी घातलेले ८०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तसेच संबंधित दुकानदारांकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. भिवंडी शहरात महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी महापालिकेच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या स्वच्छता मोहिमेंतर्गत प्लास्टिक मुक्त भिवंडी करण्याचा संकल्प आहे.
गुरुवारी महापालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकाने नजराना कंपाउंड, शिवाजीनगर, गुरुदेव फरसाण मार्ट, भिवंडी सिनेमागृह परिसर, तीनबत्ती बाजारपेठ, बॉम्बे फरसाण मार्ट या सर्व भागात पालिकेने विशेष मोहीम राबवली. यामध्ये ८०० किलो प्लास्टिक जप्त केले. तसेच विक्रेत्यांकडून ३५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. एकल वापराचे प्लास्टिक (सिंगल युज) तीन वेळा वापरताना आढळल्यास त्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु चौथ्या वेळेला नियमानुसार कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो. यापुढेही कारवाई अशीच सुरू राहणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली.