ठाणे: विविध प्राधिकरणांच्या अखत्यारित असलेल्या महामार्गांवर पावसाळ्यात दरवर्षी खड्डे पडतात. परंतु हे रस्ते ठाणे महापालिका हद्दीतून जात असल्यामुळे खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टिका होते. नेमकी हिच बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने महामार्गावरील रस्ते खड्डेमुक्त रहावेत, यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्यासंबंधीचे पत्र ठाणे महापालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागांना पाठविले असून त्याचबरोबर या विभागांसोबत खड्डेमुक्तीसाठी पाठपुरावाही सुरू केल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

ठाणे महापालिकेने शहराच्या अंतर्गत भागातील बहुतांश रस्ते काँक्रीटचे केले आहेत. काही रस्ते मास्टीक पद्धतीने तयार केले आहेत. त्यासाठी राज्य शानसाने कोट्यावधी रुपयांचा निधी दिला होता. यातून ही रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. काँक्रीटीकरणामुळे शहराच्या अंतर्गत भागातील रस्त्यांवरून यंदाच्या पावसाळ्यात खड्डेमुक्त प्रवास होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील रस्ते अनेक ठिकाणी नादुरुस्त झाले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातून मुंबई-नाशिक महामार्ग तसेच मुंबई -अहमदाबाद मार्गाला जोडण्यात आलेला घोडबंदर रस्ताही जातो. हे रस्ते वाहतूकीसाठी महत्वाचे मानले जातात. या मार्गांवरून अवजड तसेच नोकरदार वर्गाची वाहने वाहतूक करतात. या वाहनांची संख्याही मोठी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यारित असलेल्या या मार्गांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. हे रस्ते केवळ पालिकेच्या हद्दीतून जात असल्यामुळे खड्ड्यांच्या मुद्दयावरून पालिकेवर टिका होते. या टिकेनंतर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेकडूनच खड्डे भरणीची कामे करण्यात येतात.

यंदा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेने गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू केल्या असून त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागांना पत्र पाठवून पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामे करण्यास सांगितले आहे.चौकट

घोडबंदर मार्गावरील मुख्य रस्ता तसेच उड्डाण पुलांवर पावसाळ्यात खड्डे पडतात. उड्डाण पुलावर मास्टीक पद्धतीने रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र, मास्टीकचे फुगवटे अनेक ठिकाणी तयार झाले आहेत तर, काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. मेट्रो प्रकल्पाची कामे याठिकाणी सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. मुंबई महानगर प्राधिकरणाच्या अखत्यारीत पुर्व द्रुतगती महामार्ग आनंदनगर ते माजिवडा नाका (५ किमी), सेंट्रल रेल्वे उड्डाण पुल, (८५० मीटर), तीन हात नाका उड्डाण पुल (६५० मीटर), मुंब्रा बाह्यवळण वाय जंक्शन उड्डाणपुल (५३० मीटर), घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ता विलनीकरण प्रकल्प (१०.५० कि.मी) हे रस्ते येतात. याशिवाय, एमएमआरडीएमार्फत मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. हे सर्वच रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्याची सूचना पालिकेने केली आहे.पुर:सदृश्य परिस्थीती आणि कोंडी

घोडबंदर आणि सेवा रस्त्याच्या जोडणीचे काम सुरू आहे. या कामासाठी अस्तित्वातील पावसाळी पाणी वाहू नेणारी गटारे तोडण्यात आली आहेत. याठिकाणी नवीन गटाराची उभारणी करण्यात येत असून ती जुन्या गटारांना जोडण्यात आलेली नाहीत. यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा होणार नाही आणि त्यामुळे पुर:सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच घोडबंदर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊ शकते, अशी भीती प्रशासनाने व्यक्त करत पावसाळी पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होईल, याची दक्षता घेण्याची सूचना एमएमआरडीएला केली आहे.उपाययोजना करा

राडारोडा उचलणे, रस्त्यांची नियमित साफसफाई, पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारे साफसफाई, सिमेंट काँक्रीट रस्ता भेगा भरणे, मास्टीक अस्फाल्ट पद्धतीने रस्ते दुरुस्ती, कर्बस्टोन, दुभाजक सफाई आणि रंगरंगोटी, थर्मोप्लास्टिक आणि झेब्रा पेंटींग, सुरक्षात्मक उपाययोजना आणि रिफ्लेक्टर बसविणे, कामे पुर्ण झालेल्या ठिकाणी मार्गरोधक आत घेणे, रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गरोधक रस्त्याच्या पातळीच्या वर उचलणे, अशा सूचना केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.