ठाणे : दिवाळीच्या काळात मिठाईच्या दुकानांमध्ये मोठ्याप्रमाणात खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी क्षयरोगमुक्त मिठाई दुकान अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये बुधवारी पहिल्याच दिवशी एका नामांकित मिठाई दुकानातील दीडशे कामगारांची क्षयरोग तपासणी करण्यात आली आहे. या कामगारांमुळे ग्राहकांना क्षय रोगाची लागण होऊ नये या उद्देशातून हे अभियान शहरात राबविण्यात येत आहे.
ठाणे शहरात क्षयरोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून नागरिकांची क्षयरोग तपासणी करण्यात येते. यामध्ये गेल्यावर्षी शहरात ८ हजार ५०० हून अधिक क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी १४ जणांचा मृत्यूही झाला होता. यंदा जानेवारी ते ऑक्टोंबर या दहा महिन्याच्या कालावधीत शहरात ७ हजार ५५६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ५ जणांचा मृत्यु झाला आहे. क्षयरोगाचे वेळीच निदान झाले तर, हा रुग्ण पुर्णपणे बरा होऊ शकतो. यामुळे लक्षणे जाणविल्यास तात्काळ तपासणी करून घेण्याचे आवाहन पालिकेकडून सातत्याने करण्यात येत असून त्याचबरोबर शहरातील नागरिकांची क्षयरोग तपासणी करण्यात येत आहे. संपुर्ण शहर क्षयरोग मुक्त व्हावे, या उद्देशातून पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी क्षयरोगमुक्त मिठाई दुकान अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे.
दिवाळी सणानिमित्त मिठाईंच्या दूकानात ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होते. तेथील एखाद्या कर्मचाऱ्याला क्षयरोगाची लागण झालेली असेल तर त्याच्यापासून इतरांनाही क्षयरोगाचा संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने क्षयरोगमुक्त मिठाई दुकान अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. या मोहिमेसाठी पालिका क्षयरोग विभागाने आठ पथके तयार केली आहेत. हि पथके दुकानांमध्ये जाऊन कामगारांची क्षयरोग तपासणी करीत आहेत. डिजीटल एक्सरे यंत्राद्वारे कामगारांचे एक्सरे जागेवरच काढले जात असून त्यात संशयित आढळून आला तर त्याची थूंकीची तपासणीसाठी घेतली जात आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी एका नामांकित मिठाई दुकानातील दिडशे कामगारांची क्षयरोग तपासणी करण्यात आली असून त्यांचे वैद्यकीय तपासणी अहवाल लवकरच प्राप्त होणार आहेत. दहा तारखेपर्यंत सर्व दुकानांमधील कामगारांची तपासणी पुर्ण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे.
हेही वाचा : डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीने प्रवासी हैराण
“क्षयरोग हा आजार संसर्गजन्य आजार आहे. दिवाळीच्या काळात मिठाई दुकानात खरेदीसाठी मोठी गर्दी होते. तेथील कामगार क्षयरोग बाधीत असेल तर त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ शकतो. ग्राहकांची आरोग्य सुरक्षितता लक्षात घेऊन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोगमुक्त मिठाई दुकान अभियान हाती घेण्यात आले आहे. या तपासणीत एकही रुग्ण आढळून आला नाही तर, त्या दुकानांबाहेर क्षयरोगमुक्त मिठाई दुकान असे स्टिकर लावले जाणार आहेत” – डॉ. प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी, क्षयरोग विभाग, ठाणे महापालिका