ठाणे : करोना काळात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेले कर्मचारी अद्यापही पालिका सेवेत कार्यरत असून त्यापैकी कामचुकार करणाऱ्या शंभर कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेने कामावरून काढून टाकण्याची कारवाई वर्षभरात केली आहे. यानिमित्ताने कामचुकार कर्मचाऱ्यांना पालिकेने घरचा रस्ता दाखविल्याची चर्चा सुरू झाली आहे.

करोनाच्या पहिल्यादरम्यान रुग्ण संख्येत वाढ झाली, त्यावेळी रुग्ण सेवा पुरविण्यासाठी पालिकेकडील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडू लागली. यामुळे करोना काळात रुग्णांना चांगले उपचार मिळावेत आणि त्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशातून पालिकेने ६५० जणांची कंत्राटी पद्धतीने भरती केली. यामध्ये डाॅक्टर, परिचारिका यासह इतर अशा सुमारे ६५० च्या आसपास कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले होते. सहा महिन्यांकरिता ही भरती करण्यात आली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना मुदत वाढ देण्यात आली होती. करोना काळानंतर पालिकेने या सर्वांचे कंत्राट रद्द करून त्यांना कामावरून काढले होते. यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलने केली होती. यावरून नव्या वादाला तोंड फुटले होते. या वादात राजकीय पक्षांनी उडी घेतली होती. करोना काळात जीवाची बाजी लावून या सर्वांनी रुग्ण सेवा देण्याचे काम केले. यामुळे या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यात यावे आणि पालिकेच्या भरती प्रक्रीयेत या सर्वांना प्रथम संधी द्यावी, अशी भुमीका राजकीय नेत्यांनी मांडली.

राजकीय नेत्यांच्या आग्रहानंतर या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रूजू करून घेण्यात आले आणि महापालिकेच्या ३३ आरोग्य केंद्र, रुग्णालय आणि प्रसुतीगृहात या कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. पालिकेत सध्या नव्याने भरती प्रक्रिया होत नसतानाच सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे पालिकेने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवलेले आहे. असे असले तरी, यातील काही कर्मचारी हे आपल्या मर्जीनुसार कामावर येत असल्याची बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. तसेच कर्तव्यावर असताना कामचुकारपणा करणे, तेथील डॉक्टर, परिचारीका यासह अधिकाऱ्यांशी उध्दपटणे बोलणे, सतत रजेवर जाणे, त्यानंतर पाच ते सात महिन्यानंतर पुन्हा कामावर रुजु होणे अशी बाबही प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांची पालिकेने माहिती घेऊन आतापर्यंत शंभर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी या वृत्तास दुजोरा देत अशा कर्मचाऱ्यांमुळे प्रामाणिकपणे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांवरही परिणाम होत होता. तसेच या कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने इतर कर्मचाऱ्यांनाही शिस्त लागली असून ते आता चांगल्या प्रकारे काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.