ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी शहरातील बेकायदा इमारत पाडण्याची कारवाई सुरू असतानाच, ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. यातील दोन इमारतधारकांनी कारवाई थांबविण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवले आहेत तर, उर्वरित ५२ इमारतींमधील रहिवाशांना पालिका प्रशासनाने नोटीस बजावण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मिळावा यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनासोबत चर्चा सुरू केली आहे. त्याचबरोबर इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत करण्याचेही नियोजन आखले आहे, अशी माहीती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामे उभारण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागले आहेत. करोना काळात महापालिकेची यंत्रणा आरोग्य सुविधा पुरविण्याच्या कामात व्यस्त होती. त्यावेळी सक्रीय झालेल्या भुमाफियांनी बेकायदा बांधकामे उभारण्यास सुरूवात केली होती. या बांधकामांच्या मुद्द्यावरून टिका होऊ लागताच, पालिकेने विशेष मोहीम हाती घेऊन त्यावर हातोडा मारला होता. यानंतर भुमाफियांनी बांधकामे उभारणीची कामे थांबविली होती. दरम्यान, दोन वर्षांपुर्वी कारवाई थंडावताच भुमाफिया पुन्हा सक्रीय झाले. ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा सर्वच भागात बेकायदा इमारती उभारण्यात येत होत्या. त्यावरून पालिकेवर टिका होऊ लागली होती. या बांधकामांचा मुद्दा विधानसभा अधिवेशनातही उपस्थित झाला होता. यानंतर पालिकेने बेकायदा इमारतींची यादी तयार करत पोलिस बंदोबस्तात त्या तोडण्याची कारवाई सुरू केली होती. ही कारवाई थांबल्यानंतर आता पुन्हा बेकायदा बांधकामे सुरू झाल्याचे समोर आले होते. असे असतानाच दिवा परिसरातील ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. यातील दोन इमारतधारकांनी कारवाई थांबविण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवले आहेत, अशी माहीती पालिका सुत्रांनी दिली.
दिवा परिसरात २०१७ ते २०२१ या काळात उभारण्यात आलेल्या इमारतींविरोधात एका नागरिकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. यात २०१७ ते २०२१ या काळात उभारण्यात आलेल्या ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले. यातील दोन इमारतधारकांनी कारवाई थांबविण्यासाठी न्यायालयातून आदेश मिळविला असून उर्वरित ५२ इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. या इमारतींमधील रहिवाशांना पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. कारवाईच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून रहिवाशांच्या बैठका घेऊन त्यांना न्यायालयाच्या आदेशाबाबत माहिती दिली जात आहे. या इमारतींचे पाणी आणि वीज जोडणी तोडण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. तसेच पोलिस बंदोबस्त मिळताच टप्प्याटप्प्याने या इमारतींचे बांधकाम पाडले जाणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
इमारतीमधील रहिवाशांच्या बैठका घेऊन त्यांना न्यायालयाच्या आदेशाबाबत माहिती दिली जात आहे. या इमारत धारकांना नोटीसा बजावून इमारती खाली करण्यास सांगण्यात येत आहे. या सर्व प्रक्रियेला काहीसा कालावधी जाणार आहे. त्यानंतर पोलीस बंदोबस्त कसा मिळतो, त्यावर पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे.-मनिष जोशी, उपायुक्त, ठाणे महापालिका