शहरात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने बंदी घातलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देणाऱ्या विक्रेत्यांविरोधात महापालिकेकडून सातत्याने कारवाई सुरु असून त्याचबरोबर आता होळी निमित्ताने पाण्याचे फुगे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात पालिकेने विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत घोडबंदर आणि दिवा भागात पथकाने नुकतीच कारवाई करून ४३ हजारांचा दंड वसुल केला असून त्यापाठोपाठ येत्या दोन दिवसांत म्हणजेच १६ आणि १७ मार्चला नौपाडा, उथळसर, वागळे, कळवा आणि मुंब्रा परिसरात अशीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
पर्यावरणास घातक असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. तरीही शहरातील विविध विक्रेत्यांमार्फत अशा पिशव्या ग्राहकांना दिल्या जात आहेत. त्यामुळे अशा विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर पालिकेच्या प्रदुषण विभागाकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईत प्लास्टीक पिशव्या जप्त करण्याबरोबरच विक्रेत्यांकडून दंडाची रक्कम वसुल केली जात आहे. या कारवाईमध्ये पाचशे रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंत दंड आकारला जात आहे. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत शहरातील ७५० दुकानांवर प्लास्टिक पिशव्यांसंदर्भात कारवाई करण्यात आली असून या दुकानदारांकडून दोन लाख ३० हजार ४०० रूपांचा दंड वसूल करण्यात आला. तर, ३५६ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. याशिवाय, दोन हजार १८४ कापडी पिशव्या दुकानदारांना उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
होळी निमित्ताने पाण्याचे फुगे मारण्यासाठी प्लास्टीक पिशव्यांचा वापर करण्यात येतो. गेले दोन वर्षे करोना निर्बंधामुळे होळी साजरी झाली नव्हती. परंतु यंदा करोना निर्बंध शिथिल झाल्यामुळे होळी साजरी करण्याचे बेत आखले जात आहेत. तसेच पाण्याचे फुगे मारण्याचे प्रकारही शहरात सुरु झाले आहेत. या फुग्यांमुळे नागरिकांना इजा होण्याची शक्यता असते. असे प्रकार यापुर्वी घ़डले आहेत. त्यामुळे पालिकेने आता पाण्याचे फुगे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. यासाठी पालिकेने विशेष चार पथके तयार केली आहेत. या पथकाने दिवा स्थानक परिसरात ५५ दुकानांमध्ये कारवाई करून १५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. तसेच दुकानदारांकडून २१ हजारांचा दंड वसुल केला. त्याचप्रमाणे घोडबंदर येथील पातलीपाडा हिरानंदानी ईस्टेट भागातून २५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असून त्यांच्याकडून २२ हजारांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये पाण्याच्या फुग्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्यांबरोबरच इतर पिशव्यांचाही समावेश आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
पर्यावरणास घातक असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई केली जात असून त्याचबरोबर आता होळी निमित्ताने पाण्याचे फुगे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे. या फुग्यांमुळे नागरिकांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे. तसेच नैसर्गिक रंगाचा वापर करावा. – मनिषा प्रधान, प्रदुषण अधिकारी, ठाणे महापालिका