ठाणे : ठाणे महापालिकेच्या कारभारात गतीमानता आणि पारदर्शकता यावी, या उद्देशातून ई- ऑफिस प्रणाली लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या अर्जासह विविध प्रकल्पांच्या प्रस्ताव ऑनलाईनद्वारे हाताळणार असून येत्या १ एप्रिलपासून ही प्रणाली लागू करण्यासाठी पालिकेने विविध विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रणालीमुळे पालिकेने कागदविरहीत कामकाजाच्या दिशेने पहिले टाकल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये ठाणेकरांना पालिका मुख्यालय किंवा प्रभाग समिती कार्यलयात यावे लागू नये यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच ठाणे महापालिकेच्या कारभारात गतीमानता आणि पारदर्शकता यावी यासाठी ई-प्रणाली लागू करण्यात येईल, अशा घोषणा राव यांनी केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी आता येत्या १ एप्रिलपासूनच करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला असून त्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून पालिका प्रशासनाकडून सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शासनाच्या एनआयसी या संस्थेच्या माध्यमातून ठाणे महापालिका प्रशासन ई-प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. ही प्रणालीद्वारे विविध प्रस्तावांच्या नस्तींवर संबंधित अधिकारी ऑनलाईनद्वारे मान्यता देणार आहेत. त्यामुळे हे कामकाज कसे करायचे याचे प्रशिक्षण महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिका मुख्यालय तसेच माजिवडा येथील युआरसीटीच्या कार्यालयात दिले जात आहे. एनआयसी या संस्थेचे चार अधिकारी हे प्रशिक्षण देत असून येत्या ही प्रणाली १ एप्रिल पासून नागरी सुविधा केंद्रात सुरू करण्याचा पालिकेने निर्धार केला आहे.

 यामुळे प्रस्तावाची नस्ती किंवा नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. अनेकदा विविध प्रस्तावांच्या नस्ती पालिकेतून गायब झाल्याचे समोर आले होते. मात्र, या प्रणालीमुळे नस्ती गायब होण्याचे प्रकार टळणार आहेत. या प्रणालीद्वारे मंजुर झालेले प्रस्ताव तसेच इतर महत्वाचे दस्तऐवज ठाणेकरांना महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. या प्रणालीसाठी महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एक शासकीय ई मेल आयडी करण्यात आला आहे, अशी माहीती पालिका सुत्रांनी दिली. पहिल्या टप्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन या पध्दतीने कामे केली जाणार आहेत. त्यानंतर टप्याटप्याने ऑफलाईन पध्दत बंद करुन संपूर्ण कारभार हा ऑनलाईन पध्दतीने चालविला जाणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.