ठाणे : येथील बाळकुम आणि कोलशेत खाडी परिसरातील कांदळवनातील खारफुटीवर भराव टाकण्यासाठी तयार करण्यात आलेले रस्त्यांचे प्रवेशद्वार पालिका प्रशासनाने खणून हा मार्गच बंद केले असून त्यापाठोपाठ आता या भागात खारफुटीवर टाकण्यात आलेला मातीचा भराव पालिकेकडून काढून टाकण्यात येणार आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तसे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच कांदळवन भरावाबाबत यंत्रणांना आक्रमक भुमिका घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

ठाणे शहराला ३२ किमीचा खाडीकिनारा लाभला आहे. ठाणे खाडी परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर काही पक्षी-प्रजाती आढळत असल्यामुळे या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा विशेष महत्त्व आहे. यामुळेच ठाणे खाडी क्षेत्राला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा आहे. असे असले तरी या खाडी किनारी भागात गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण वाढले आहे. ठाणे शहरातील मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीला लागूनच असलेल्या कोलशेत खाडी परिसरातील खारफुटीवर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून नवे बेट उभारण्यात आले आहे. यातील काही भागावर शाळा, टर्फ आणि गॅरेजची उभारणी करण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी भराव टाकून जमीन सपाटीकरणाची कामे सुरू होती. यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येण्याबरोबरच भविष्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या संबंधीचे वृत्त लोकसत्ता ठाणे मध्ये प्रसिद्ध होताच खडबडून जाग आलेल्या पालिका आणि जिल्हा प्रशासनावर खारफुटीवरील भराव रोखण्यासाठी पाऊले उचलली होती.

हेही वाचा…डोंबिवली एमआयडीसीतील न्यूओ ऑर्गेनिकच्या कंपनी मालकावर आगी प्रकरणी गुन्हा

खारफुटीवर भराव टाकण्यासाठी तयार करण्यात आलेले रस्त्यांचे प्रवेशद्वार पालिका प्रशासनाने खणून हा मार्गच बंद केला आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी खाडी भरावाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर चौकशी समिती नेण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले असून त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने खाडी भराव प्रकरणी कापुरबावडी पोलिस गुन्हा दाखल केला आहे. त्यापाठोपाठ आता पालिका प्रशासनाने येथे चर खोदून कांदळवनाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे प्रवेशद्वारे बंद करण्याबरोबरच कांदळवन संवर्धनाबाबत फलक लावले आहेत. मुंबई महापालिकेनेही मोठी वाहने या भागात प्रवेश करू नयेत यासाठी उंच वाहन मार्गरोधक बसवले आहेत. आता हा भराव काढून टाकण्याची कारवाई ठाणे महापालिका करणार आहे. वन विभाग आणि महसूल विभाग यांच्याशीही येथील परिस्थितीबाबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे.

हेही वाचा…ठाण्यात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, महिलेचा खून झाल्याचे शव परिक्षण अहवालातून उघड

कांदळवनावरील राडारोड्याचा भराव काढून टाकण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने आक्रमक व्हावे. आपल्या कृतीतून या संवेदनशील विषयाबाबत महापालिकेची आक्रमक भूमिका दिसली पाहिजे. त्यासाठी येत्या तीन दिवसात आतापर्यंत झालेली कारवाई आणि पुढील तीन महिन्यात करायचा कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले आहेत.