ठाणे : लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ठाणे महापालिकेत ४०० कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचा बार उडवून देण्याचा बेत सत्ताधारी शिवसेनेने प्रशासनाच्या मदतीने आखला आहे. त्यासाठी गुरुवारी स्थायी समितीच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर या कामांना हिरवा कंदील दाखवला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि नगरसेवकांच्यातील संघर्षांमुळे स्थायी समितीची बैठक झाली नव्हती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर आयुक्त आणि नगरसेवकांतील संघर्ष मिटला आणि त्यानंतर स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी झालेल्या या बैठकीत विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती. या मंजुरीनंतर सत्ताधारी शिवसेनेने त्यापैकी काही विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवडय़ात लागू होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ात घेण्यात आलेली स्थायी समितीची बैठक निवडणुकांपूर्वीची अखेरची बैठक असल्याची चर्चा होती. मात्र अद्याप आचारसंहिता जाहीर झाली नसल्यामुळे स्थायी समितीची आणखी एक बैठक घेण्याचा निर्णय सत्ताधारी आणि प्रशासनाने घेतला आहे. आठ दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेऊन ७ मार्चला ही बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीपुढे शहरातील विकासकामांचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवले जाणार असून बैठकीतील मंजुरीनंतर या कामांच्या उद्घाटन व भूमिपूजनाचे कार्यक्रम लगेचच उरकण्याची योजना शिवसेनेने आखल्याच कळते.
३५० ते ४०० कोटींचे रस्ते
ठाणे महापालिकेच्या विविध कामांच्या निविदांमध्ये संगनमत होत असल्याच्या संशयावरून त्यांची पडताळणी करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. त्यात ७०० कोटी रुपयांच्या रस्त्यांसह विविध कामांचा समावेश आहे. या पडताळणीमध्ये ज्या निविदा योग्य आहेत, त्यांची यादी करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. तेवढीच कामे स्थायी समितीपुठे ठेवली जाणार असून त्यामध्ये सुमारे ३५० ते ४०० कोटी रुपयांच्या रस्त्यांचा समावेश असेल, अशी शक्यता महापालिका सूत्रांनी वर्तविली आहे. निवडणुकांपूर्वीच ही कामे सुरू व्हावीत, यासाठी सत्ताधारी शिवसेनेचे नेते कमालीचे आग्रही आहेत. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नरमाईची भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना खूश केल्याचे कळते.