ठाणे : शहरातील धोकादायक इमारती, रस्ते रुंदीकरण तसेच विकास प्रकल्पातील बाधितांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेल्या भाडेतत्वावरील योजनेतील सदनिकांमध्ये घुसखोरीचे प्रकार थांबता थांबत नसल्याचे महापालिका प्रशासनाने घेतलेल्या विशेष मोहीमेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या सदनिका परस्पर भाड्याने देण्याचे प्रकारही वाढले आहेत. वर्तकनगर येथील दोस्ती या भाडेतत्वावरील योजनेतील इमारतीत महापालिकेने बुधवारी कारवाई केली आहे. यामध्ये ५१ घुसखोरांना बाहेर काढून सदनिकांना टाळे लावण्यात आले. त्यापैकी १२ सदनिका परस्पर भाड्याने देण्यात आलेल्या होत्या. अशाचप्रकारची कारवाई आता इतर इमारतींमध्ये केली जाणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठाणे महापालिकेला भाडेतत्वारील योजनेतून एकूण १९ इमारती दिल्या आहेत. शहरातील दहा ठिकाणी या इमारती असून त्यात ५६७० सदनिका आहेत. या इमारती १२ ते २२ मजल्यापर्यंतच्या आहेत. मानपाडा येथील ॲक्मे रेंटल हाऊसिंग, दोस्ती इम्पोरिया, बाळकुम येथील काबुर लोढा, विष्णूनगर येथील छेडा आणि छेडा रेंटल हाऊसिंग, वर्तकनगर दोस्ती रेंटल, खोपट येथील मॅजेस्टिक रेंटल, मुंब्रा येथील दोस्ती रेंटल, भाईंदर पाडा आणि हाजुरी अशा ठिकाणीइमारती उभ्या आहेत. या इमारतींमधील सदनिका शहरातील धोकादायक इमारती, रस्ते रुंदीकरण तसेच विकास प्रकल्पातील बाधितांना तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आली आहे. अनेक बाधित अद्याप सदनिकांच्या प्रतिक्षेत आहेत.
हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात झिकाचा एकही रुग्ण नाही पण, काळजी घ्या; जिल्हा आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन
त्याचबरोबर शहरात समुह पुर्नविकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील इमारतींच्या उभारणीसाठी तेथील लाभार्थींना तात्पुरते स्थलांतरण करावे लागणार आहे. यामुळे भाडेतत्वावरील योजनेतील सदनिकांचा माहिती गोळा करण्याच्या सुचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या होत्या. त्याचबरोबर स्थावर मालमत्ता विभागानेही सदनिकांची माहिती घेण्यास सुरूवात केली होती.
विशेष मोहीम
महापालिकेने घेतलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात वाटप केलेल्या सदनिका आणि प्रत्यक्षात इमारतीत वास्तव्यास असलेल्या सदनिकांची संख्या यात तफावत असल्याची बाब स्थावर मालमत्ता विभागाच्या निदर्शनास आली. यामुळे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनिष जोशी आणि सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांनी विशेष पथक तयार केले. या पथकाने इमारतींमध्ये जाऊन प्रत्येक सदनिकाधारकांची चौकशी सुरू केली आहे. यात ५१ सदनिकांमध्ये बाधितांऐवजी इतर नागरिक बेकायदा राहत असल्याचे आणि त्यापैकी १२ सदनिका भाड्याने देण्यात आल्याची बाब समोर आली.
परस्पर दिल्या भाड्याने सदनिका
वर्तकनगर येथील दोस्ती या भाडेतत्वावरील योजनेतील इमारतीमध्ये पालिकेने बुधवारी केली. त्यात ५१ घुसखोरांना बाहेर काढून सदनिकांना टाळे लावले आहे. काही बाधितांना मुळ जागेवर सदनिका उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी भाडेतत्वावरील योजनेतील घरांच्या चाव्या पालिकेकडे जमा केल्या आहेत. परंतु त्या घरांचे टाळे तोडून त्याठिकाणी इतर नागरिक वास्तव्य करित होते. सदनिका मिळालेल्या नागरिकांना इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी दोन हजार रुपये भाडे पालिकेकडे जमा करावे लागते. पण, काही बाधितांनी त्यांना मिळालेल्या सदनिका भाड्याने दिल्या आहेत. या भाडेकरूंकडून पाच ते दहा हजार रुपये भाडे आणि १५ हजार अनामत रक्कम घेण्यात आली होती. याच इमारतीत एका दुध विक्रेता महिलेने पाच ते सहा सदनिका भाड्याने दिल्याचे उघड झाले आहे. टाळे लावण्यात आलेल्या सदनिकांमध्ये भाडे थकबाकीदारांचा समावेश असून दोन दिवसात पालिकेने २० लाखाहून अधिक थकीत रक्कम वसुल केली आहे.
“वर्तकनगर येथील दोस्ती या भाडेतत्वावरील योजनेतील इमारतीमधील बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ५१ जणांना बाहेर काढून सदनिकांना टाळे लावले आहे. त्यापैकी काही सदनिका याच इमारतीत राहणारे तसेच सदनिका मिळालेल्या काही नागरिकांनी भाड्याने दिल्याचे समोर आले असून त्यांना देण्यात आलेले घराचे करार रद्द करून ते ताब्यात घेण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच इतर इमारतींमध्ये सुद्धा ही कारवाई केली जाणार आहे.” – मनीष जोशी, उपायुक्त ठाणे महापालिका