ठाणे : तलवांचे शहर अशी ओळख टिकविण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून विविध उपक्रम राबविले जात असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील २३ तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंगता कचरा साफ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जलप्रदुषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून यासंबंधीच्या प्रस्तावास प्रशासकीय सभेने मान्यता दिली आहे.
ठाणे शहराला ‘तलावांचे शहर’ म्हणून ओळखले जाते. एकेकाळी शहरात ७५ हून अधिक तलाव होते. परंतु अतिक्रमणामुळे अनेक तलाव नामशेष पावले. शहरात सद्यस्थितीत ३५ तलाव आहेत. या तलावांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तलावांचा परिसर सुशोभित करण्याबरोबरच पाणी शुद्धीकरणांसाठी यंत्रे बसविण्यात येत आहेत. गणेश मुर्ती विसर्जनामुळे तलाव प्रदुषित होऊ नयेत यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येत आहेत. असे असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील २३ तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंगता कचरा साफ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
हेही वाचा >>> दुर्गाडी किल्ला परिसरात जैसे थे स्थिती ठेवण्याचे कल्याण जिल्हा न्यायालयाचे आदेश
शहरातील तलावांच्या परिसरात नागरिक सकाळ आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येत असतात. सणांच्या कालावधीत याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांच्या ठिकाणी नागरिक मोठी गर्दी करतात.या तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात तरंगत्या कचऱ्यात वाढ होऊन पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून आणि जलप्रदुषण नियंत्रणाकरिता तलावांच्या पृष्ठभागाची दैनंदिन साफसफाई करणे गरजेचे आहे. त्यामुळेच पालिकेने आता शहरातील २३ तलावांची निवड करून त्याठिकाणी साफसफाईसाठी मनुष्यबळ पुरविण्याच्या कामाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यास पालिकेच्या प्रशासकीय सभेने मान्यता दिली आहे.
हेही वाचा >>> रोलरखाली चिरडून मजुराचा मृत्यू
या तलावांची होणार सफाई
कळवा, मुंब्रा व दिवा भागातील दिवा तलाव, खिडकाळी डायघर तलाव, फडकेपाडा तलाव, दातीवली तलाव, शिळ तलाव, मुंब्रेश्वर तलाव, कौसा तलाव, न्यु शिवाजी नगर तलाव, ठाणे शहरातील मखमली तलाव, पांडुरंग भोईर तलाव, कोलबाड तलाव, गोकुळनगर तलाव, सिध्देश्वर तलाव, ब्रम्हाळा तलाव, गांधी नगर तलाव, कचराळी तलाव, घोडबंदर भागातील कासारवडवली तलाव, रेवाळे तलाव, कोलशेत तलाव, डावला तलाव, तुर्फेपाडा तलाव, जेल तलाव, देवसर तलाव यांची सफाई केली जाणार आहे. या कामासाठी १ कोटी १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.