ठाणे : कला पदव्युत्तर पदवी (एमए -मराठी) शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतल्याचे वृत्त गुरूवारी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच, शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी वेतनवाढ रोखण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तर, मनसेने पालिका मुख्यालयात या आदेशाविरोधात आंदोलन केले.
राज्यात मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये मराठीत बोलणे अनिवार्य करण्यात आले असतानाच, दुसरीकडे कला पदव्युत्तर पदवी (एमए -मराठी) शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रक पालिका प्रशासनाने काढले असून यामुळे एमएचे शिक्षण घेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. सातवा वेतन आयोगात शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतनवाढ देय असण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झालेले नसल्याचे सांगत पालिकेने हा निर्णय घेतला आहे. या संबंधीचे वृत्त लोकसत्ता मध्ये गुरूवारी प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका मुख्यालयात आंदोलन करत आदेश रद्द करण्याची मागणी केली.
शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी वेतनवाढ रोखण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महापालिकेची पूर्वपरवानगी घेवून अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या डी.एल.जी.एफ.एम, एल.एस.जी.डी, एल.जी.एस तसेच विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या एम.ए. (मराठी) परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नियमानुसार त्यांना अतिरिक्त वेतनश्रेणी लागू करण्यात येत होती. परंतु प्रशासनाने परिपत्रक काढून अतिरिक्त वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय महापालिका स्तरावर घेतला आहे. हा आदेश अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्यात यावा अशी लेखी मागणी खासदार म्हस्के यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ठाणे महापालिकेने कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे होते, असे सांगत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या दालनात आंदोलन केले. दरम्यान, पालिकेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने पंधरा दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले आणि त्याचे वृत्त विविध वृत्तपत्रातही प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे ही वृत्तपत्र आपण वाचली का, असा प्रश्न उपस्थित करत गुरूवारीही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे माळवी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मनसे कार्यकर्ते निषेधाच्या घोषणा देत काही वेळाने तेथून निघून गेले.