ठाणे : दिवा आणि भांडर्ली परिसरातील कचराभुमी ठाणे महापालिकेने बंद केली असली तरी त्याठिकाणी कचऱ्याचे ढिग कायम असून या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून तेथील जमीन पुर्वरत करण्यासाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात २२ लाख मेट्रीक टनपैकी साडे आठ लाख मेट्रीक टन इतक्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून ही जमीन कचरामुक्त करून पुर्वीप्रमाणे केली जाणार आहे.
राज्य शासनाने ठाणे महापालिकेला कचरा भुमीसाठी भिवंडी येथील आतकोली भागात जागा देऊ केली असून येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीसाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर डायघर येथेही कचऱ्यापासून वीज निर्मीती करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प पुर्णपणे कार्यान्वित झालेला नसला तरी याठिकाणी कचरा वर्गीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. या दोन्ही ठिकाणी कचराभुमी होण्यापुर्वी पालिका प्रशासनाकडे हक्काची कचराभुमी नव्हती. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणारा ९५० मेट्रिक टन कचरा दिवा भागात टाकला जात होता. येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक क्षमतेचे प्रकल्प उभारले नाहीत म्हणून हरीत लवाद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पालिकेला वांरवार नोटीसा येत होत्या.
हेही वाचा >>>आनंद दिघे यांच्या आश्रमात नोटांची उधळण; समाजमध्यमांवर चित्रफीत प्रसारित,ठाकरे गटाची शिंदे गटावर टीका
या कचराभूमीमुळे परिसरात दुर्गंधी पसरण्याबरोबरच सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे ही कचराभूमी बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून आंदोलने केली होती. परंतु डायघर प्रकल्प कार्यान्वित होण्यास उशीर होत होता. त्यामुळे डायघर प्रकल्प सुरू होईपर्यंत शहराबाहेर म्हणजेच भांडर्ली भागात पालिकेने जागा भाड्याने घेऊन तिथे कचरा टाकण्यास सुरू केले होते. या कचराभुमीमुळे शेतीचे नुकसान होऊ लागले. यामुळे स्थानिकांनी कचराभुमीस विरोध सुरू केला. अखेर पालिकेने डायघर प्रकल्पाचे काम पहिल्यात सुरू करत भांडर्ली कचराभुमी बंद केली. असे असले तरी दिवा आणि भांडर्ली कचराभुमीवर कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत. हे ढिग हटवून तेथील जमीन पुर्वरत करण्यासाठी पालिका प्रशासनाने आता पाऊले उचलली आहेत. यासाठी पालिकेने निविदा काढल्या आहेत. या संदर्भात घनकचरा विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.
ठाणे महापालिका क्षेत्रातील जुन्या कचराभुमी व्यवस्थापनासाठी (लेगसी वेस्ट) मान्यता प्राप्त आणि अनुभवी निविदाकारांकडून पालिका करून घेणार असून त्यानुसार पालिकेने ही निविदा काढली आहे. दिवा आणि भांडर्ली कचराभुमीवर अंदाजे २२ लाख मेट्रीक टन कचरा आहे. पहील्या टप्प्यात त्यापैकी साडे आठ लाख मेट्रीक टन इतक्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून ही जमीन कचरामुक्त करण्यात येणार आहे. तर, उर्वरित कचऱ्याचीही अशीच विल्हेवाट लावली जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.