लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींची विक्री आणि विसर्जन करू नये अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता पीओपीचा मूर्त्यांचा वापर यावर्षीच्या गणेशोत्सवात टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने मूर्तीकारांना शाडूची माती आणि मूर्ती घडविण्यासाठी जागा विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात १५ दिवसांत महापालिकेकडे मागणीची नोंद करण्याच्या सूचना मुर्तीकारांना करण्यात आल्या आहेत. या निर्णयास मूर्तीकारांचा प्रतिसाद मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पर्यावरणास हानीकारक असलेल्या पीओपी गणेशमूर्ती बनविणे, त्यांची विक्री करणे आणि विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ही मार्गदर्शक त्तत्वे योग्य ठरवली आहेत. त्यामुळे सुधारित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार आणि महापालिकांना दिले होते. त्यानंतर माघी गणेशोत्सवात विसर्जनावरून वाद झाला होता.
ठाणे शहरात गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन ठाणे खाडी, तलावात आणि महापालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये केले जाते. त्यामुळे प्रदूषणाच्या मुद्द्यावरून पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात होती. यंदाच्या गणेशोत्सवात पीओपीच्या गणेशमूर्ती तयार होऊ नये यासाठी आता महापालिकेने पुढाकार घेतला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ठाणे महापालिकेने आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मूर्तीकार तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची १६ जानेवारीला बैठक घेतली होती.
तसेच, ०३ फेब्रुवारी रोजी पर्यावरण पूरक गणेशोत्सव नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, मूर्तीकारांना विनामुल्य शाडूची माती आणि जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. मूर्तीकारांनी शाडूच्या मातीची मागणी तसेच जागेसाठी अर्ज लवकरात लवकर करण्याचे आवाहन मूर्तीकारांना केले आहे. त्यानुसार, शाडूची माती मूर्तीकारांना उपलब्ध केली जाणार आहे. तसेच, जागांसाठी अर्ज आल्यास त्यानुसार प्रभागनिहाय जागा शोधून त्या मूर्तीकारांना मूर्ती घडविण्यासाठी विनामूल्य जागा देता येतील, असे ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले.
अर्ज कुठे करावा
शाडूच्या मातीसाठी पाचपाखाडी येथील ठाणे महापालिका मुख्यालयाच्या प्रदूषण नियंत्रण विभाग आणि जागेसाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालय येथे अर्ज करावा लागणार आहे. पुढील १५ दिवसांत हे अर्ज सादर करावे असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेने घेतलेला हा निर्णय सकारात्मक आहे. शाडूची माती विनामुल्य मिळत असल्याने मूर्तीकारांना चांगला नफा यामध्ये मिळणार आहे. शाडूची माती कुठून आणणार हा मुर्तीकारांचा प्रश्न होता. तो देखील आता सुटणार आहे. परंतु यात सुसूत्रता आणण्यासाठी महापालिकेने मुर्तीकारांच्या संघनटनांकडून मुर्तीकारांची माहिती घ्यावी. तसेच मुर्तीकार शाडूच्या मातीतून किती मुर्ती घडविणार याचे देखील हमीपत्र घ्यावे. -रोहीत जोशी, पर्यावरणवादी कार्यकर्ते.