ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. आमदार सुभाष भोईर यांचा मुलगा सुमित भोईर याचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांनी सुमित भोईर यांचा पराभव केला आहे.

ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक २९ अ मध्ये शिवसेनेने सुमित भोईर यांना उमेदवारी दिली होती. तीन नगरसेवक निवडून जाणारा ठाणे महापालिकेच्या हद्दीतील हा एकमेव प्रभाग आहे. सुमित भोईर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील आणि मनसेच्या दिनेश पाटील यांचे आव्हान होते. या लढतीमध्ये बाबाजी पाटील यांनी सुमित भोईर यांचा पराभव करत शिवसेनेला हादरा दिला आहे. प्रभाग क्रमांक २९ मध्ये खर्डी, डावले, पडले, देसाई, खिडकाळी, डायघर या भागाचा समावेश आहे. बहुतांश वस्ती ही ग्रामीण भागातील असून तिथे भूमिपुत्रांचा भरणा जास्त आहे. या भागात काही प्रमाणात मुस्लिम समाजाचीसुद्धा मते होते. पण मतदारांनी सुमित भोईर यांच्याऐवजी बाबाजी पाटील यांना साथ दिली आहे. शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची होती. पाच वर्षांपूर्वी सुभाष भोईर यांचा राष्ट्रवादीच्याच हिरा पाटील यांनी पराभव केला होता. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आमदार भोईर यांनी मुलगा सुमीत याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. प्रभाग क्रमांक २९ बमधून मनसेच्या पार्वती म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलोचना पाटील यांचा विजय झाला आहे.

दरम्यान, दिव्यातील प्रभाग क्रमांक २७ मधून शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक २७ अमध्ये शैलेश पाटील, बमध्ये अंकिता पाटील, कमध्ये दिपाली भगत आणि डमध्ये अमर पाटील यांचा  विजय झाला.