ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी पुलाखाली बेकायदा वाहने उभी राहू नये. तसेच नागरिकांना चालणे, व्यायामासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी सुमारे सात वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेने नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शन पर्यंत उद्यान उभारले आहे. या उद्यानामुळे परिसरातील जेष्ठ नागरिक, क्रीडापटू येत असत. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आता हे उद्यान ‘डम्पिंग’चा भाग झाल्याचे चित्र आहे. मार्गरोधक, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा, कारवाई केलेले फलक अशा विविध वस्तू येथे साठविल्या जात आहे. भंगार वाहने, महापालिकेची वाहने देखील येथेच उभी असतात. त्यामुळे एकेकाळी हिरवाईने नटलेला हा परिसर आता कचराभूमी ठरू लागल्याचे चित्र आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनी उड्डाणपूलाखाली पूर्वी अनधिकृतरित्या शेकडो दुचाकी, कार, अवजड वाहने उभी करण्यात येत होती. तसेच या वाहनांच्या मागे गर्दुल्ले दारू किंवा अमली पदार्थांची नशा करत होते. त्यामुळे परिसराची रया निघून गेली होती. तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता. हा प्रकार रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने २०१७ मध्ये ‘पीपीपी’ तत्त्वावर या भागाचा विकास करण्यास सुरुवात केली होती. महापालिकेने या पूलाखाली सायकल ट्रॅक, चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य, दोन्ही बाजूंनी रोपांची हिरवळ अशा सुविधा निर्माण केल्या होत्या. त्यामुळे या परिसराचा अक्षरश: कायापालट झाला होता.
हेही वाचा…ठाणे जिल्ह्यात पाणी कपातीची शक्यता
पाचपाखाडी, नितीन कंपनी, कॅडबरी, खोपट भागात वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी विरंगुळ्यासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली होती. येथे जवळपास कुठेही उद्यान अथवा मोठी बाग नव्हती. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात होते. उड्डाण पुलाच्या प्रत्येक खांबावर निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाविषयी सुविचार आणि घोषवाक्ये लिहिलेली होती. रात्रीच्या वेळी विविध रंगांची रोषणाई केली जात होती. त्यामुळे या रंगातून हा परिसर उजळून निघत होता. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या उद्यानाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.
पुलाखाली महापालिकेने बिघाड झालेल्या सिग्नल यंत्रणा ठेवल्या आहेत. उद्यानाखालील सायकल ट्रॅक देखील तोडण्यात आले आहे. उद्यानाखाली काही पत्र्यांचे निवारे बांधण्यात आले आहे. त्यामुळे उद्यानात चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची अडवणूक होत आहे. तसेच महापालिकेने कारवाई केलेल्या जाहिरातींचे फलक, प्लास्टिकचे तुटलेल्या अवस्थेतील मार्गावरोधक, भंगात दुचाकी आणि मोटारी ठेवल्या आहेत. लाकडी बांबूचा खच पडलेला आहे. काही उद्योग देखील या उद्यानात सुरू झाले आहे. जाहिरात फलकांना लावले जाणारे लोखंडी खांब येथे जोडले जात आहेत. त्यामुळे उद्यानाचा वापर खासगी कंपन्यांकडूनही बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे चित्र आहे. या उद्यानाची अवस्था वाईट झाल्याने चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उद्यानाचे बकालीकरण रोखा अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत ठाणे महापालिकेचे वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार जाधव यांना संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचा…कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना धमकी देणारा अटकेत
गेल्या अनेक महिन्यांपासून उड्डाणपूलाखालील जागा भंगार साहित्यांनी व्यापली आहे. त्यामुळे चालणे देखील कठीण झाले आहे. पूर्वी हा परिसर सुस्थितीत होता. महापालिकेने येथे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होईल. – संदेश जिमन, रहिवासी, लुईसवाडी.