ठाणे : ठाणे परिवहन उपक्रमातील कायमस्वरुपी कामगारांना ८० हजारांचे वेतन दिले जाते पण, त्यांच्या इतकेच काम करून आम्हाला १८ ते १९ हजारांचे वेतन दिले जाते. त्यातही गेल्या तीन वर्षात वेतन वाढ झालेली नाही. वाढत्या महागाईमुळे सद्यस्थिती मिळणारे वेतन तुटपुंजे ठरत असल्याने कुटूंबाचा उदारनिर्वाह करणे शक्य होत नाही, अशा व्यथा संप पुकारलेल्या ठाणे परिवहन उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केल्या.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ४७४ बसगाड्या आहेत. त्यापैकी ३९० बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी वाहतूकीसाठी उपलब्ध होत. त्यापैकी २४० बसगाड्या कंत्राटी पद्धतीने चालविण्यात येत असून या ठेकेदाराकडे बसगाड्यांच्या संचलनासाठी ५५० वाहनचालक, २०० पुरुष वाहक, १५० महिला वाहक, १५० वाहन दुरुस्ती आणि सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या कामगारांच्या विविध मागण्या असून त्यात वेतनवाढ ही प्रमुख मागणी आहे. त्यासाठी गेले काही महिने ते संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, त्यावर कोणताच निर्णय होत नसल्यामुळे वाहकांनी मंगळवारी पहाटेपासून संप पुकारला आहे.
हेही वाचा : ठाणे : अपंगांच्या डब्यात धडधाकड प्रवाशांची घुसखोरी, तीन वर्षांत नऊ हजारहून अधिकजणांवर कारवाई
आम्हाला जेवढे वेतन मिळायला हवे, तेवढे वेतन मिळत नाही. महागाई वाढत असून त्या तुलनेत मिळणारे वेतन तुटपुंजे आहे. कंपनीला वारंवार निवदेन देऊनही त्यांनी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आम्ही सर्व कामगारांनी संप पुकारला आहे. आम्ही ठरवून दिलेल्या बस फेऱ्या पुर्ण केल्या नाही तर, आम्हाला दंड आकारण्यात येतो, असे धडक कामगार संघटनेचे अध्यक्ष तानाजी कळंबे यांनी सांगितले. गेल्या नऊ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करीत आहे. आतापर्यंत १५ ते १७ हजारांच्या वर कोणत्याही कामगारांना पगार मिळालेला नाही. महागाईच्या काळात इतक्या कमी पगारात कुटूंबाचा रहाटगाडा चालविणे कामगारांना शक्य होत नाही. तीन वर्षांची वेतनवाढही मिळाली नाही. आम्ही कायमस्वरुपी इतकेच काम करतो. त्यांना ८० हजार पगार देण्यात येतो. तर, आमच्या सारखांना ८० हजार नको पण, ३५ हजार इतके तरी वेतन द्या, असे वाहक दिगंबर माळी यांनी सांगितले.
हेही वाचा : ठाणे : उड्डाणपूलाखाली बेकायदा वाहनतळासह टपऱ्या
कामगारांच्या मागण्या
ठोक मानधन ३५ हजार इतके द्यावे. वार्षिक पगार वाढ दोन हजार रुपयांनी करावी. कुठल्याही कामगारांना दंड आकारला जाऊ नये. प्रत्येक कामगारांचा अडीच लाखांचा आरोग्य विमा (मेडीक्लेम) काढण्यात यावा. वर्षातील २२ सुट्ट्या भरपगारी देण्यात याव्यात. ७ ते १० तारखेच्या आत वेतन देण्यात यावे आणि सण असल्यास लवकर वेतन देण्यात यावे, अशा मागण्यांसाठी वाहकांनी संप पुकारला आहे.