ठाणे : दिवा येथील बेतवडे परिसरात पंतप्रधान आवास योजनेतून परवडणारी घरे उभारणीसाठी सातत्याने निविदा काढूनही त्यास बांधकाम व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ठेकेदाराला पैसे देऊन त्याच्याकडून घरे बांधून घेण्याच्या प्रस्तावावर पालिकेने विचार सुरू केला आहे. आधीच्या प्रस्तावामध्ये खासगी लोकसहभाग (पीपीपी) या तत्वावर पालिका नियुक्त विकासकाकडून १४४१ घरे बांधून घेण्यात येणार होती आणि उर्वरित जागेत त्याला विक्रीसाठी घरे उभारणीस परवानगी दिली जाणार होती.परंतु आताच्या प्रस्तावामुळे घरेबांधणीसाठी संपुर्ण जागा उपलब्ध होणार असल्याने याठिकाणी तीन हजार घरे उभारणे शक्य होईल, असा पालिकेचा अंदाज आहे.
दिवा येथील बेतवडे परिसरातील दोन भुखंडावर खासगी लोकसहभाग (पीपीपी) या तत्वावर पंतप्रधान आवास योजनेतून परवडणाऱ्या घरांची उभारणी करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने काही वर्षांपुर्वी घेतला.

या प्रकल्पात आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी १ हजार ४४१ घरांची उभारणी केली जाणार आहे. त्यापैकी त्यापैकी १ हजार २५३ लाभार्थ्यांना परवडणारी घरे अल्पदरात उपलब्ध होणार आहेत. तर, उर्वरित १८८ नागरिक प्रकल्पबाधित असून त्यांना सदनिकेसाठी दोन लाख रुपये भरावे लागणार आहेत. या सदनिका ३० चौरस मीटर चटई क्षेत्राच्या असणार आहेत. या प्रकल्पाच्या कामासाठी पालिका प्रशासनाने सल्लागार कंपनीची नेमणुक करून सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला होता. या आराखड्यानुसार पालिका प्रशासनाने निविदा काढली होती. त्यामध्ये पाच वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीसह एक हजार ४४१ सदनिकांपेक्षा अधिक सदनिका स्वखर्चाने महापालिकेस बांधून देईल अशा विकसकाची नियुक्ती करण्यात येणार होती. या व्यतिरिक्त विकासकाला व्यावसायिक विक्री करण्याची मुभा देण्यात येणार होती. परंतु या निविदेस विकासकाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. निविदेतील अटी व शर्तींमध्ये पालिकेने बदल करून पुन्हा निविदा काढली. पण, त्यास प्रतिसाद मिळू शकलेला नाही. यामुळे ठेकेदाराला पैसे देऊन त्याच्याकडून घरे बांधून घेण्याच्या प्रस्तावावर पालिकेने विचार सुरू केला असून या प्रस्तावामुळे घरेबांधणीसाठी संपुर्ण जागा उपलब्ध होणार असल्याने याठिकाणी तीन हजार घरे उभारणे शक्य होईल, असा पालिकेचा अंदाज आहे.

हेही वाचा…BJP MLA : “मी लायक वाटलो नसेन…” मंत्रिपद न मिळाल्याने भाजापा आमदाराची खदखद

सुरूवातीच्या निविदेत विकासकाने सव्वा लाख चौरस मीटर क्षेत्रफळाचे यापूर्वी काम केले असावे अशी एक अट निविदेत होती. शासकीय योजनेत घरांची उभारणी करण्याचा अनुभव असणाऱ्या ठेकेदारांनाच या प्रकल्पाच्या निविदेत सहभागी होता येईल, अशी अट होती. परंतु विकासकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पालिकेने ही अट कायम ठेवत त्याचसोबत शासनाच्या बांधकाम क्षेत्रातील उर्जा प्रकल्प, दुरसंचार, बंदरे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो, औद्योगिक वसाहत, लाॅजिस्टिक पार्क, जलवाहिनी, सिंचन, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, महामार्ग आणि पुल अशा कामांचा अनुभव असणाऱ्या ठेकेदारांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. तसा बदल करून निविदा काढली होती. त्यासही ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळू शकलेला नाही.

हेही वाचा…पहिल्या पत्नीच्या घटस्फोटासाठी माहेरून पैसे न आणल्याने दुसऱ्या पत्नीला तलाक, कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीतील घटना

दिवा येथील बेतवडे परिसरात पंतप्रधान आवास योजनेतून परवडणारी घरे उभारणीसाठी सातत्याने निविदा काढूनही त्यास ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ठेकेदाराला पैसे देऊन त्याच्याकडून घरे बांधून घेता येतील का, यावर विचार सुरू आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु या प्रस्तामुळे अधिक घरे पालिकेला उपलब्ध होऊ शकतील, असा अंदाज आहे. प्रशांत सोनाग्रा नगरअभियंता, ठाणे महापालिका

Story img Loader