हर घर दस्तक मोहिमेत लसीकरणावर भर

ठाणे : महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग वाढू लागला असून त्याचबरोबर शहरात डेंग्यु आणि मलेरिया अशा साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. पावसाळ्यात करोनाबरोबरच साथीच्या आजारांचे रुग्ण वाढण्याची भिती व्यक्त होत असून या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आतापासून खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने हर घर दस्तक मोहिमेच्या माध्यमातून लसीकरणाचा वेग वाढविला असून त्यात गेल्या १४ दिवसांत ७ हजार ६०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर साथ रोग रोखण्यासाठी पंक्चर दुकानांबाहेरील टायर्समधील साचलेल्या पाण्याची तपासणी करण्यात येणार असून त्यात ड़ासांची पैदास झाल्याचे आढळून आले तर त्या दुकानदारांवर दंड़ात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे साथ नियंत्रणासाठी ठाणे पालिका सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दररोज १२०० च्या आसपास करोना चाचण्या करण्यात येत असून त्यामध्ये शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. शहरात सद्यस्थितीत १ हजार ६०३ सक्रीय रुग्ण आहेत. त्यापैकी केवळ ९५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर, उर्वरित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ९५ रुग्णांमध्ये परदेशातून प्रवास करून आलेले, तीव्र ताप, नेहमीपेक्षा वेगळी लक्षणे आणि सहव्याधी अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यापैकी ७ रुग्ण प्राणवायु खाटांवर उपचार घेत असून त्यांना कमी प्रमाणात प्राणवायु लागत आहेत. १४ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. अतिदक्षता विभागात दाखल असलेले रुग्णांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आलेले नसून त्यांना सहव्याधी असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिथे ठेवण्यात आले आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने हर घर दस्तक-२ ही मोहीम हाती घेतली आहे. २ जून पासून सुरु झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत ७ हजार ६०० नागरीकांचे लसीकरण करण्यात आले असून या मोहिमेत घरोघरी जाऊन नागरिकांना पहिली आणि दुसरी मात्रा देण्यात येत आहे. पहिली आणि दुसरी मात्रा धरुन ३४ लाखापैंकी ३१ लाख ५ हजार ७८० नागरिकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. त्यात पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण ९९.३९ टक्के तर दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण ८८ टक्के आहे. वर्धक मात्रा आतापर्यंत ७५ हजार नागरीकांनी घेतली आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने हर घर दस्तक-२ मोहिमेत लसीकरणाचा वेग वाढविला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरात शहरामध्ये डेंग्युचे तीन तर मलेरियाचे २८ रुग्ण आढळून आले होते. पावसाळ्यापुर्वीच साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने पालिका शहराची चिंता वाढली आहे. पावसाळ्यात साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात दरवर्षी टायर पंक्चर्स दुकानांबाहेर उघड़्यावर ठेवलेल्या टायर्समध्ये किंवा दुकानांच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत टाकलेल्या टायर्समध्ये पावसाचे पाणी साचते. या पाण्यात मलेरीया, चिकनगुनीया तसेच ड़ेंग्युताप पसरविणाऱ्या ड़ासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे अशा दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. पावसाळ्यात दुकानदारांनी दुकानाबाहेर उघड़्यावर ठेवलेल्या निकामी टायर्समध्ये किंवा पाण्याच्या पिंपामध्ये पावसाचे पाणी साचले आणि त्यात ड़ास-अळी तयार झाल्याचे आढळून आले तर मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार संबंधित दुकानदारावर पालिकेच्या आरोग्य विभागाकड़ून दंड़ात्मक कारवाई करण्यात येणार आहे. साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पालिकेने अशा निर्णय घेतला असून तशा सूचना टायर पंक्चर्स दुकानदारांना दिल्या आहेत.

दुकानदारांनी दुकानाबाहेर निकामी टायर्स ठेवू नयेत. तसेच टायर्स एकावर एक रचून ताड़पत्रीने आच्छादीत करुन ठेवावेत किंवा एखाद्या बंदीस्त गोदामात ठेवावेत. त्याचप्रमाणे पंक्चर तपासण्यासाठी ठेवलेले पाण्याचे टब दर दोन ते तीन दिवसांनी रिकामे करुन सुक्या कपड़्याने कोरड़े करुन पुन्हा भरावे. जेणेकरुन त्यामध्ये ड़ास-अळ्यांची पैदास होणार नाही, अशा सुचनाही पालिकेच्या आरोग्य विभागाने दुकानदारांना दिल्या आहेत.