विसर्जन घाट, कृत्रिम तलावांची कामे अंतिम टप्प्यात; खड्डेभरणीची कामे युद्धपातळीवर

येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त ठाणे महापालिका सज्ज झाल्याचे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन घाट आणि कृत्रिम तलावांची कामे अंतिम टप्प्यात असून शहरातील खड्डे भरणीची कामेही युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

शहरात घरगुती गणेशोत्सवासह सार्वजनिक गणेशोत्सव हे मोठय़ा उत्साहाने साजरे केले जातात. गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावे यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत आहे. यंदा महापालिकेकडून गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर विविध उपाययोजना शहरात राबवण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान तलावांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने पर्यायी विसर्जन व्यवस्थांची उभारणी करण्यात आली आहे. पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी लहान गणेशमूर्तीसोबतच पाच फूट आणि त्यापेक्षा मोठय़ा आकाराच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी महापालिकेने आरतीस्थाने आणि निर्माल्य कलश या सुविधेबरोबरच नागरिकांना विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.

नागरिकांनी महापालिकेच्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून करण्यात आले आहे.

व्यवस्था काय?

*  महाघाटाच्या आवारात पाणबुडी पथक, अग्निशमन दल, वैद्यकीय पथक अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.

* गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने रायलादेवी, उपवन, आंबेघोसाळे या तलाव परिसरात कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे.

* निळकंठ वुड्स, टिकूजीनी वाडी, बाळकुम रेवाळे, खारेगाव येथेही कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत.

* दीड दिवसाचा, पाच दिवसांचा आणि दहा दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जना दिवशी सुरक्षेची व्यवस्था पाहण्यासाठी पोलीस यंत्रणेबरोबरच महापालिकेचे सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलाचे जवान, एनसीसीचे विद्यार्थी, अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेचे पाचशे प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत.

* विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विसर्जन महाघाट, सर्व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

श्री गणेशमूर्ती स्वीकृती केंद्रे

ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मूर्तीचे विसर्जन करता येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी महापालिकेतर्फे मासुंदा तलाव परिसर आणि मढवी हाऊस, चिरंजीवी हॉस्पिटल, जेल तलाव परिसर, खिडकाळी, उपवन तलाव, खारीगाव, मॉडेला चेकनाका यासारख्या इतर ठिकाणी मूर्ती स्वीकार केंद्रे उभारण्यात येणार असल्याचेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Story img Loader