ठाणे : रेल्वे स्थानकातील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पुलांच्या कामांसाठी मंजुर असलेला निधी गेल्या दोन वर्षांपासून पालिकेने रेल्वे विभागाला दिला नाही. यामुळे पुलाचे काम रखडल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत असून याच मुद्द्यावरून खासदार राजन विचारे यांनी पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. रंगरंगोटी, विद्युत रोषणाईवर पैसे खर्च करण्याऐवजी पालिकेने मंजुर निधी रेल्वे विभागाला देण्याची सुचना करत ठाणे रेल्वे स्थानकात एलफिस्टन सारखी दुर्घटना घडली तर, त्यास महापालिका जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज ७ ते ८ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना ये-जा करण्यासाठी स्थानकात सात पादचारी पुल होते. त्यापैकी पाच पुल प्रवाशांना ये-जा करण्यासाठी उपलब्ध आहेत. उर्वरित दोन पुल धोकादायक झाल्याने त्याजागी नवीन पुलांची उभारणी करण्यात येत आहे. दोन पुल बंद असल्याने उर्वरित पुलांवर पादचाऱ्यांचा भार वाढला आहे. यासंदर्भाचे वृत्त शुक्रवारी लोकसत्ता ठाणे सहदैनिकात ‘ठाणे स्थानकात प्रवाशांची कोंडी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनीही कल्याण दिशेस असलेला पादचारी पुल सॅटिसला जोडण्यात यावा अशी मागणी रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक नरेश लालवाणी व मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
ठाणे रेल्वे स्थानकात उभारण्यात येत असलेल्या पादचारी पुलांच्या कामासाठी २०१९ मध्ये २४ कोटी रुपयांचा निधी ठाणे महापालिकेने मंजुर केला होता. या पुलांची कामे रेल्वे विभागामार्फत सुरू आहेत. २४ कोटींपैकी ८ कोटी रुपये पालिकेने रेल्वेकडे जमा केले आहेत. उर्वरित रक्कम २०२०-२१ च्या आर्थिक वर्षात दिली जाईल असे ११ डिसेंबर २०१९ च्या गोषवाऱ्याद्वारे कबुल केले होते. परंतु उर्वरित निधी अद्याप पालिकेने दिलेला नसल्यामुळे रेल्वेने काम धीम्यागतीने सुरु ठेवले आहे. उर्वरित निधी तात्काळ रेल्वेकडे वर्ग करावा अशी मागणी खासदार विचारे यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना पत्राद्वारे केली आहे. महापालिकेने रंगरंगोटी, विद्युत रोषणाईवर पैसे खर्च करण्याऐवजी ठाणेकर नागरिकांच्या मुळ गरजा लक्षात घेऊन पादचारी पुलासाठी उर्वरित निधी रेल्वेकडे वर्ग करावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.