ठाणे : महापालिका क्षेत्रातील सफाई कामगारांना एका खासगी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट घड्याळ देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून त्यातील जीपीएस प्रणालीद्वारे कर्मचारी त्याच्या नेमुन दिलेल्या ठिकाणी काम करतो आहे की नाही, याची माहीती प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. सफाई कामगारांना शिस्त लागावी तसेच काम करताना एखादी दुर्घटना घडल्यास त्याची तात्काळ माहिती मि‌ळावी या उद्देशातून पालिकेने हा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात दहा कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात स्मार्ट घड्याळांचे वाटप करण्यात असून उर्वरित कर्मचाऱ्यांनाही लवकरच स्मा्र्ट घड्याळ दिले जाणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात ४ हजारांच्या आसपास सफाई कर्मचारी काम करीत आहेत. त्यात महापालिका आस्थापनेवरील आणि ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहराच्या विविध भागात महापालिकेच्या हजेरी शेड असून त्याठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना शहर स्वच्छतेसाठी परिसर नेमूण देण्यात आलेले आहेत. अनेक कर्मचारी सफाईचे चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. परंतु काही कर्मचारी कामचुकारपणा करीत आहेत. काही कर्मचारी केवळ हजेरी लावून निघून जातात. अशा कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून पालिकेकडून काही उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता लीग उपक्रमांतर्गत पालिका प्रशासनाने सफाई कामगारांना एका खासगी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट घड्याळ देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात दहा कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात स्मार्ट घड्याळांचे वाटप करण्यात असून उर्वरित कर्मचाऱ्यांनाही लवकरच स्मा्र्ट घड्याळ दिले जाणार आहे.

हेही वाचा : पालिकेचे नियम कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी पण, त्रास मात्र सर्वसामान्य ठाणेकरांना

या घड्याळातील जीपीएस प्रणालीमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांवर नजर ठेवणे शक्य होणार असून यामुळे त्यांना नेमुण दिलेल्या ठिकाणी ठरवून दिलेल्या वेळेत काम करावे लागणार आहे. सफाई कामगार हे जीव धोक्यात घालून काम करीत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्याबरोबरच हे घड्याळ त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणार आहे. काही वे‌ळेस काम करताना दुर्घटना घडते. कर्मचारी आ़जारी पडतो. त्याला दुखापत होते. त्याच्यासोबत दुसरा कर्मचारी असेल तर, त्याच्या आरोग्याची माहिती मिळते. परंतु एखादी दुर्घटना घडल्यास कर्मचारी स्मार्ट घड्याळातील एका कळद्वारे तात्काळ वरिष्ठांना कळवू शकतो. जेणेकरून त्याला तात्काळ मदत करणे शक्य होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. या वृत्तास महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दुजोरा दिला आहे.

Story img Loader