लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाने ठाणे महापालिकेला दिलेल्या भिवंडीतील आतकोलीच्या जागेवर कचरा प्रकल्प उभारणीसाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असल्या तरी या कामाच्या निविदेस प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे पालिका प्रशासनाने आता निविदेतील अटी व शर्तींमध्ये बदल केला असून यात दहा वर्षांच्या अनुभवाची अट शिथिल करत ती पाच वर्षे करून नव्याने पुन्हा निविदा काढली आहे. त्यास प्रतिसाद मिळेल का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नाही. डायघर भागात कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला असला तरी, तो पुर्णपणे अद्याप कार्यान्वित होऊ शकलेला नाही. यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याची मोठी समस्या असून या समस्या पालिकेसाठी डोकेदुखी ठरताना दिसते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ठाणे महापालिकेला शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भिवंडीतील आतकोली भागात ३४ हेक्टर इतकी जागा देऊ केली आहे. या भूखंडावर ठाणे महापालिकेच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या प्रकल्पाच्या पूर्व तयारीचे काम सुरू आहे.

याठिकाणी बांधा, वापरा आणि हस्तांतरण या तत्वावर ६०० ते ८०० टन मेट्रीक क्षमतेचा घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या प्रकल्पात कचऱ्याचे तीन टप्प्यात वर्गीकरण केले जाणार आहे. जळाऊ साहित्य बाजूला करून ते सिमेंट कारखाना किंवा इतरत्र विकणे, खत निर्मिती करणे आणि घातक पदार्थ नसलेले साहित्य जमीन भरावासाठी वापरणे, असे वर्गीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी दहा वर्षांच्या संचलनाकरीता पालिकेने निविदा काढली होती. त्यात यात दहा वर्षांच्या अनुभवाची अट होती. परंतु या निविदेस ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पालिकेने ही अट शिथिल केली असून केवळ पाच वर्षे अनुभवाची अट नमुद करून नव्याने पुन्हा निविदा काढली आहे. त्यास प्रतिसाद मिळेल का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

गायमुख खत प्रकल्प

राज्य शासनाच्या मूलभूत सोयी विकास योजनेअंतर्गत ठाणे महापालिकेस १५० कोटी रुपयांचा निधी उपबल्ध झाला आहे. त्यात, गायमुख येथे एकूण ९७ टन आणि नागला बंदर येथे ५० टन क्षमतेचा खत प्रकल्प तसेच, १.५ टन क्षमतेच्या खत निर्मितीच्या दोन मोबाईल व्हॅन यांचा समावेश आहे. यापैकी गायमुख प्रकल्पाकरिता उच्च दाबाची वीज जोडणी घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून या कामासाठीही पालिकेने निविदा काढली आहे.

Story img Loader