ठाणे : दरवर्षी शास्त्रज्ञ सी.व्ही.रामण यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. विविध ठिकाणी वैज्ञानिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट यांच्यावतीने ‘आजी आजोबांबरोबर विज्ञानाची मज्जा’ हा अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. बालवयातच विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमागे असणारे वैज्ञानिक कारण समजावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तर सरस्वती मंदिर ट्रस्ट मराठी शाळेत विद्यार्थी शिक्षक बनून विद्यार्थ्यांना विज्ञानातील प्रयोग शिकवणार आहेत.
भारतामध्ये विज्ञान क्षेत्रातील विद्वान संशोधक, शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत. यामध्ये सी.व्ही.रामण यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी भौतिकशास्त्रामध्ये संशोधन केले आहे. नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी शोधून काढलेल्या सिद्धान्ताचा वापर आजच्या विविध प्रयोगांमध्ये केला जातो. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी भारतामध्ये २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालय तसेच अनेक संस्थांच्यावतीने विविध विज्ञानविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट या संस्थेच्या मागील २० वर्षापासून ठाण्यात बालवयापासूनच लहान मुलांमध्ये विज्ञानाचे संस्कार रूजावे या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाचा विज्ञान दिन हा ‘आजी आजोबांबरोबर विज्ञानाची मस्ती’ या संकल्पने अंतर्गत रंगणार आहे. यावेळी ज्येष्ठ आजी आजोबा लहान मुलांना रोजच्या जीवनातील विज्ञानाचे वैश्ष्ट्य खेळाच्या माध्यमातून समाजावून सांगणार आहेत. यामध्ये वयवर्ष ४ ते ८ वयोगटातील मुलांचा सहभाग असणार आहे.
लहान मुलांमध्ये संस्कार रुजावे यासाठी बालवयापासूनच त्यांना प्रार्थना, ध्यान, योग शिकवले जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीमागे वैज्ञानिक बाजु आहे हे मुलांना समजावे या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. तसेच मुलांना प्रश्न विचारण्याची सवय लागावी, प्रत्येक गोष्ट का घडते आहे याची उत्सुकता असावी यासाठी हा उपक्रम आयोजित केला जात असल्याचे जिज्ञासा संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुरेन्द्र दिघे यांनी सांगितले.
उपक्रमात असणार काय ?
- फुग्याच्या सहाय्याने हवेचा दाब समजावणे
- पाण्यात दगड टाकून व्यापली जाणारी जागा दर्शवणे
- चमच्याच्या सहाय्याने आकारमान शिकवणे
शाळेतील विद्यार्थी होणार विज्ञानाचे शिक्षक
सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेतील ८ वी, ९ वीचे विद्यार्थी ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग शिकवणार आहेत. तर, ५ वी ते ७ वी मधील काही विद्यार्थी १ ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना प्रयोग दाखवणार आहेत. केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा जीनोम इंडिया हा प्रकल्प काही काळातच यशस्वी झाला. त्याचा गौरव सोहळा नुकताच ठाण्यातील बा. ना. बांदोडकर महाविद्यालय येथे पार पडला. त्याचप्रमाणे जीनोम इंडिया प्रकल्प आणि जनुकीय आजार यावर आधारित प्रदर्शन देखिल महाविद्यालयात भरवण्यात आले होते. यावेळी भित्तीपत्रके, प्रतिकृती, विज्ञानखेळ आणि पथनाट्याच्या माध्यमातून डीएनए, जनुकशास्त्र आणि रोगनिदान याविषयीची माहिती नागरिक आणि विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त डॉ. महेश बेडेकर यांच्या कल्पनेतून राष्ट्रीय विज्ञान दिनाच्यामिमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला.