ठाणे : मुंबई महानगरातल्या अवजड वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंब्रा बाह्यवळण मार्गावर अवजड वाहने रोखून त्यांच्याकडून पैसे घेतले जात असून यासंबंधीची चित्रफित राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने खळबळ उडाली आहे. या मार्गावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची पथके तैनात असतात आणि त्याचबरोब स्थानिक पोलिसांची गस्तही या मार्गावर असते. तरीही वाहन चालकांकडून पैसे वसूलीचे प्रकार सुरू असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
हेही वाचा : “जितेंद्र आव्हाड यांनीच अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन करायला लावले”, आनंद परांजपे यांचा गौप्यस्फोट
हेही वाचा : कबड्डीपटूंना महापालिका कायम सेवेत करण्यासाठी धोरण ठरवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूूर आणि भिवंडी शहरात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत वाहतुकीस परवानगी आहे. भिवंडी शहरात मोठ्याप्रमाणात गोदामे आहेत. त्यामुळे उरण येथील जेएनपीटी बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने या मार्गावरून वाहतुक करतात. अवेळी वाहतुक रोखण्यासाठी या मार्गावर पोलिसांची पथके तैनात असतात. परंतु या मार्गावर मध्यरात्री अवजड वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून पैसे घेतले जात असल्याची चित्रफित आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमावर प्रसारित केली आहे. ‘रात्री मुंब्रा बायपास मार्गावर पैसे जमा करणारे हे कोण आहेत? दोन -दोन तास वाहतुक कोंडी असते’ असा प्रश्न त्यांनी समाजमाध्यमावर ठाणे पोलिसांना केला आहे. या चित्रफितीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात ठाणे पोलिसांना विचारले असता, संबंधित याप्रकरणाची चौकशी करून तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.