ठाणे : राज्यातील अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवरील कारवाईनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बुलडोझरबाबा असे पोस्टर ठाण्यात झळकू लागले आहेत. परंतु या पोस्टरबाबत राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी वेगळे मत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उत्तर प्रदेशात कोणत्याही नोटिसविनाच कारवाई करण्यात आली होती. राज्यात मात्र कायद्याला धरून कारवाई होत असल्याने कुणीही बुलडोझरबाबा असे पोस्टर लावू नये आणि इतकी परिपक्वता महायुतीच्या नेत्यांमध्ये असावी, असे मत व्यक्त करत त्यांनी पोस्टर लावणाऱ्यांवर एकप्रकारे टीका केली आहे.
पुण्यात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले. या आदेशानंतर पुणे पाठोपाठ ठाणे आणि मीरा भाईंदर शहरांमध्ये अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर कारवाई सुरू आहे. उत्तर प्रदेशातही अशास्वरूपाची कारवाई झाली होती, या कारवाईनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बुलडोझर बाबा असा उल्लेख झाला होता.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या बेकायदा पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवरील कारवाईनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही बुलडोझर बाबा उल्लेख होऊ लागला असून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शहरात तसे पोस्टर लावले आहेत. त्यावर ‘ड्रग्ज माफियांचा कर्दनकाळ महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा’ असा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला आहे. परंतु या पोस्टरबाजीबाबत राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी वेगळे मत केले आहे. उत्तर प्रदेशात कोणत्याही नोटिसविनाच कारवाई करण्यात आली होती. राज्यात मात्र कायद्याला धरून कारवाई होत असल्याने कुणीही बुलडोझरबाबा असे पोस्टर लावू नये, असे परांजपे यांनी म्हटले आहे. बुलडोझर बाबा असे पोस्टर लावू नयेत, इतकी परिपक्वता महायुतीच्या नेत्यांमध्ये असावी, असे मत व्यक्त करत त्यांनी पोस्टर लावणाऱ्यांवर एकप्रकारे टीका केली आहे.
हेही वाचा…महावितरणची वीज देयक भरणा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार
कारवाईत भेदभाव नको
ठाण्यातील कारवाईत घोडबंदरच्या कोठारी कंपाऊंड परिसरातील काही बेकायदा पब आणि बारचे बांधकाम तोडण्यात आले तर, काही पब आणि बारची केवळ बाहेरील शेड तोडण्यात आली. त्यामुळे पालिकेने दिखाव्यापुरती कारवाई केल्याची टीका होत आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आनंद परांजपे यांनी सांगितले, या कारवाईत कोणताही भेदभाव करण्यात येऊ नये. महापालिका आयुक्त सौरभ राव आणि पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सगळ्यांना समान न्याय देऊन जे अनधिकृत आहे आणि कायद्याच्या चौकटीत बसत नाही अशा सगळ्यांवर कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे. राज्याचे सरकार संवेदनशील आहे, त्यामुळे हे संवेदनशील सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये उडता पंजाब महाराष्ट्राचं होऊ देणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.