ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी शिंदेच्या सेनेचे स्थानिक शिलेदारांनी शहरात जनसंवाद उपक्रम राबविण्यास सुरूवात केली. पालिका मुख्यालयातील एका सभागृहात हा जनसंवाद कार्यक्रम पार पडत असून त्यास आक्षेप घेत शिवसेनेप्रमाणेच आम्हालाही जनता दरबार घेण्यासाठी विनामुल्य सभागृह उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे भाजप, शिवसेनेपाठोपाठ शरद पवार गटाचा जनता दरबार ठाण्यात भरण्याची चिन्हे आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेण्यास सुरूवात केली. या उपक्रमाच्या माध्यमातून भाजपने शहरात आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू असतानाच, वनमंत्री गणेश नाईक यांना शह देण्यासाठी शिंदेच्या सेनेचे स्थानिक शिलेदारही मैदानात उतरले. या शिलेदारांनी शहरात जनसंवाद उपक्रम राबविण्यास सुरूवात केली. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणुन घेण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे शिलेदार हे समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसुत्रीवर आधारीत आनंद आश्रमात मंगळवारी ‘जन संवाद’ उपक्रम घेतात.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. तसेच याच उपक्रमात ते दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचारी तसेच महापालिका संबधित नागरीकांच्या तक्रारी, समस्या सोडविण्यासाठी पालिका मुख्यालयातील सभागृहात जनसंवाद उपक्रम राबवित आहेत. मात्र, पालिकेत प्रशासकीय राजवट लागू असताना त्यांना विनामुल्य सभागृह कसे उपलब्ध करून दिले जाते, याविषयी प्रश्न उपस्थित होत असून हाच मुद्दा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनीही उपस्थित करत जनसंवाद उपक्रमावर आक्षेप घेतला आहे.

ठाण्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना जनता दरबारावरून रस्सीखेच सुरु असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही जनता दरबार घेण्याचे सुतोवाच केले आहेत. शिवसेना शिंदे गट यांच्यामार्फत ठाणे महानगरपालिकेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेत जनसंवाद आयोजित करण्यात येतो. ठाणे महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये राजकीय पक्षांचे दरबार चालतात. त्यास आक्षेप घेत शिवसेनेप्रमाणेच ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील जनता दरबारासाठी सभागृह विनामुल्य उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनीही केली आहे.