ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून यामुळे ठाणे महापालिकेने पाणी बचतीसाठी पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये १६ एप्रिल ते १० जूनपर्यंत वाहने धुणे, पाण्याने वाहने साफसफाई करण्यास पालिका प्रशानसाने बंदी घातली आहे.

परंतु या निर्णयाबाबत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सर्व्हीस सेंटर बंद करून गोरगरिबांच्या पोटावर लाथ मारण्यापेक्षा पाण्याचा प्रचंड उपसा करणारी अनधिकृत बांधकामे रोखावित, असा टोला त्यांनी पालिका प्रशासनाला लगावला आहे.

सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. पावसाळा सुरू होईपर्यत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिका प्रशसानाने ठाणेकरांना केले आहे. त्यापाठोपाठ आता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये दूचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने, मोठी वाहने धुणे, तसेच पाण्याने साफसफाई करणे यासाठी पालिकेने बंदी घातली असून ही बंदी १६ एप्रिल ते १० जून पर्यंत लागू राहणार आहे.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार पाणी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु या निर्णयाबाबत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी नाराजी व्यक्त करत पालिका प्रशासनावर टीका केली आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सुहास देसाई यांनी ठाणे महापलिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले आहे. भविष्यात ठाणे शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये आणि जलसाठा कमी होत आहे. या कारणांसाठी उपाययोजना म्हणून निर्बंध घातले जात आहेत. या निर्बंधांमध्ये गोरगरीब लोक चिरडले जात आहेत. हातावर पोट असणाऱ्या घटकाची उपासमार होणार आहे.

सर्व्हीस सेंटरवर काम करणारे लोक अत्यंत गरीब आहेत. त्यांच्या रोजगाराची चिंता न करता, पालिकेने हे आदेश जारी केले आहेत. मात्र, ज्या बांधकामांना सर्वाधिक पाणी लागते, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दुसरीकडे पन्नास मजल्यांच्या इमारतीला मंजुरी दिली जात आहे. हा प्रकार चुकीचा आहे. म्हणूनच सर्वच बांधकामे बंद करावित, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.

यंदाही शहरात पाणी टंचाई

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यातच उन्हाळा सुरू झाल्यानंतर शहरात पाणी टंचाईची समस्येत आणखी वाढ होत असून यंदाच्या वर्षीही हेच चित्र कायम आहे.