सध्या ठाण्यात विविध महोत्सव सुरू आहेत. गतवर्षी काळाघोडाच्या धर्तीवर उपवन महोत्सव भरला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण दुसऱ्याच वर्षी आयोजकांचे दिवाळे निघावे अशी परिस्थिती आहे. प्रायोजक पुढे न आल्याने महोत्सव भरू शकत नसल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. खरंतर गेल्या वर्षीही प्रायोजकांपेक्षा महोत्सवाला प्रतिसाद देणाऱ्यांची गर्दीच जास्त होती. कोणत्याही महोत्सवाच्या प्रायोजकाला गर्दी हवीच असते. पण उपवन महोत्सवातल्या गर्दीबाबतचे प्रायोजकांचे व्यावसायिक गणित फसले.
दुसरीकडे, शहराच्या विविध भागांत कोकण महोत्सव, मालवण महोत्सव, कोळी महोत्सव असे उपक्रम सुरूच असतात. असाच एक मालवणी महोत्सव ठाण्यात पार पडला, तर विटावा परिसरात कोळी महोत्सव साजरा होत आहे. कोकणातील किंवा आगरी कोळी पद्धतीचे पदार्थ, पापड, लोणची, मसाले यांची विक्री आणि सोबत मसालेदार कार्यक्रम असा ढंग असलेल्या या महोत्सवांना चांगला प्रतिसाद मिळतो. पण त्यामागे व्यावसायिक गणित नसते. यामागच्या राजकीय गणितांची चर्चा करायला नको. पण असे महोत्सव भरवणाऱ्या आयोजकांनी गर्दीचे खरे आकडे जाहीर करायला सुरुवात केली, तर उपवन महोत्सवाप्रमाणे त्यांचीही व्यावसायिक गणिते बिघडल्याचेच दिसून येईल. पुस्तक महोत्सवाला तर प्रायोजक मिळत नाहीत, त्यामुळे ते बंदच आहेत.
मराठमोळय़ा ठाण्यात तसे उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराथी असे समाज महोत्सव होऊ लागले आहेत. नुकताच एक राजस्थानी महोत्सव पार पडला. दुसरीकडे महिला बचत गटांचे प्रदर्शन आणि विक्री करणारे खरेदी महोत्सव वर्षभर इकडे तिकडे सुरूच असतात. खारेगावमध्ये कोकणातील एका ग्रामदेवतेची पालखी होळीनिमित्त आणून होळी महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे ही पालखी प्रतीकात्मक न आणता ग्रामदेवतेची मूळ पालखीच घेऊन तेथील गावकरी खारेगावपर्यंत येतात. कोकणातील पालख्या गावाच्या सीमा ओलांडून जातात असे नाही. पण ही प्रथा नवी आहे.
मूळचे ठाणे हे नगर बदलले आणि मुंबईचा भार वाहणारे एक उपनगर म्हणून मुंबईच्या वेगाने सध्या धावू लागले आहे. मुंबईत नोकरी करायची आणि ठाण्यात वास्तव्यास असायचे. राहता राहता एक दिवस ठाणेकर होऊन जायचे. इथल्या आगरी, कोळी आणि मूळ मराठी संस्कृतीसोबत आपल्यात नव्या संस्कृतीचा महोत्सव भरवत पुन्हा शहराच्या नव्या संस्कृतीची चटक लावायची असे संक्रमण सध्या ठाण्यात सुरू आहे.
मुंबईत नोकरी करणाऱ्यांना मी ठाणे किंवा त्या परिसरात राहतो हे सांगण्यापेक्षा घोडबंदरला राहतो, असे सांगणे प्रतिष्ठेचे वाटू लागले आहे. म्हणून कदाचित ‘फेसबुक’वर आपण मुंबईत राहतो, असे लिहिणारे ठाणेकरही पाहायला मिळतात. ‘फेसबुक’वरील आपल्या प्रोफाइलमध्येही मी मुंबईत राहतो किंवा राहते असे लिहिणे करिअरच्या दृष्टीने अभिमानाचे, सोयीचे, प्रतिष्ठेचे वाटते. ज्या दिवशी ठाण्यात राहणारे सगळेच ठाणेकर मी ठाण्यात राहतो, असे अपडेट करतील त्या दिवशी या महोत्सवांची व्यावसायिक गणितेही जुळून येतील. प्रायोजक नाहीत म्हणून महोत्सव रद्द करण्याची वेळ आयोजकांवर येणार नाही.
प्राची
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा