ठाणे : कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलावरील अर्थात नव्या कळवा पुलावरील सुरक्षा साधने दोन वर्षांतच गायब झाली आहे. उड्डाणपुलाखालून खाडी वाहत असल्याने पुलावरील पदपथालगत ठाणे महापालिकेने सुशोभिकरण तसेच सुरक्षेच्या दृष्टिने काच सदृश्य साधने बसविली होती. त्यामुळे पदपथावर फेरफटका मारण्यासाठी आणि छायाचित्र काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही सुरक्षा साधने चोरीला गेली असून नव्याने सुरक्षा साधने बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली.
ठाणे शहरातून नवी मुंबई, मुंब्रा,कळवा, विटावा भागात वाहतुक करण्यासाठी कळवा खाडी पूल महत्त्वाचा आहे. या मार्गावरून हजारो हलकी वाहने वाहतुक करतात. जुना कळवा पूल हा वाहतुकीसाठी अरुंद होता. त्यामुळे ठाणे महापालिकेने हा तिसरा नवा खाडी पूल बांधला होता. त्यासाठी महापालिकेने १८३ कोटी रुपये खर्च केले. नोव्हेंबर २०२२ मध्ये या पुलाचे लोकार्पण झाले होते. उड्डाणपुलामुळे कळवा, कोर्टनाका आणि साकेत भागात होणारी वाहतुक कोंडीतून दिलासा मिळाला. पुल उभारताना ठाणे महापालिकेने त्याचे सुशोभिकरण केले होते. तसेच उड्डाणपुलालगत एक पदपथ बनविण्यात आले होते. उड्डाणपुलाखालून ठाणे खाडी वाहते. त्यामुळे महाालिकेने सुरक्षेच्या दृष्टिने या पदपथालगत काच सदृष्य साधने बसवून सुरक्षा कुंपण तयार केले होते. तसेच उड्डाणपुलावर विद्युत रोषणाई देखील केली होती.
हेही वाचा – मुंब्रा मराठी माणसाची कान पकडून माफी प्रकरण, अविनाश जाधव म्हणाले आता भोगा…
परंतु उड्डाणपुलावर सुरक्षा रक्षक नसल्याने येथील सुरक्षा साधने आणि विद्युत रोषणाई गायब झाली आहे. पदपथावरून अनेकजण सकाळी किंवा रात्रीच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी, छायाचित्र काढण्यासाठी येत असतात. त्यामुळे एखादी दुर्घटना होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सकाळी वाहतुक कोंडी झाल्यास दुचाकी चालक देखील या पदपथाचा वापर पदपथावर वाहने नेत कोंडी टाळतात. परंतु सुरक्षा साधने गायब झाल्याने एखादे वाहन खाडीत पडल्यास ते जीवावर बेतण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून हा उड्डाणपुल उभारला. येथे उड्डाणपुलाची आवश्यकता होती. या पुलामुळे कोंडीची समस्या देखील कमी झाली आहे. परंतु सुशोभिकरणासाठी वापरलेली साधने गायब झाली आहे. त्यामुळे येथे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. सुरक्षा साधनांअभावी एखादी दुर्घटना होऊ शकते. – नूतन जांभेकर, रहिवासी, कळवा.
हेही वाचा – मुंब्रा मराठी माणसाची कान पकडून माफी प्रकरण, अविनाश जाधव म्हणाले आता भोगा…
याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्याला विचारले असता, हे सुशोभिकरणाचे साहित्य चोरी करण्यात आले आहेत. त्याबाबत कळवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना येथे गस्ती वाढविण्याची सूचना केली आहे. तसेच नव्याने सुरक्षा साधने बसविण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नाव छापू नये या अटीवर दिली.