ठाणे : ज्येष्ठ नागरिकांची काळजी, वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करणे आणि नागरिकांसाठी स्वयं तक्रारीचा मंच तयार करण्याचा त्रिसुत्री कार्यक्रम राबविणे हा आपला प्राधान्यक्रम राहील, अशी माहिती ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त अशुतोष डुम्बरे यांनी लोकसत्ताला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या क्षेत्रात अनेक महत्वकांक्षी अशा प्रकल्पांची उभारणी सुरु आहे. त्यामुळे अनेक महत्वाच्या रस्त्यांवर नागरिकांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागतो. शहराचा विकास होत असताना दररोजच्या कोंडीतून ठाणेकरांना दिलासा मिळावा यासाठी ठोस असे उपाय आखले जातील, असेही डुम्बरे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात नुकतीच डुम्बरे यांची पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली. गेल्या काही वर्षात ठाणे पोलिसांची कामगिरी अपेक्षेनुसार होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. वाढलेली गुन्हेगारी, त्या तुलनेत गुन्हे उकल होण्याचे घटलेले प्रमाण, काही कुप्रसिद्ध गुंडांचा शहरात वाढलेला वावर यामुळे ठाणे पोलीस दलाच्या एकूण कार्यक्षमतेविषयी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना नवे पोलीस आयुक्त म्हणून डुम्बरे यांनी पदभार स्विकारला आहे. ठाणे पोलीस दलात यापुर्वीही वेगवेगळ्या पदांवर काम केल्याने त्यांना या भागाची चांगली माहिती आहे. त्यामुळे आयुक्तपदाची सुत्र स्विकारताच काही दिवसातच त्यांनी आपला प्राधान्यक्रम निश्चित केला असून लोकसत्ताशी बोलताना त्यांनी यासंबंधीची सविस्तर माहिती दिली.

ठाण्यात आपला प्राधान्यक्रम कशाला असणार आहे?

गुन्हेगारी आटोक्यात रहावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे हे खरे तर आमचे कामच आहे. याशिवाय आणखी काही कामांना मी प्राधान्य द्यायचे ठरविले आहे. घरात एकटे वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठांवरील अत्याचार आणि लुटीच्या उद्देशातून त्यांची होणारी हत्या अशा स्वरूपाचे गुन्हे गेल्या काही वर्षांपासून घडत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून पोलीस परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या घरी अधूनमधून जाऊन त्यांची विचारपूस करतात. तसेच पोलिसांची तात्काळ मदत मिळावी यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन काही वर्षांपुर्वी सुरू करण्यात आली होती. परंतु गेल्या काही वर्षापासून ही हेल्पलाईन फारशी कार्यन्वित नाही. त्यामुळे हि हेल्पलाईन नव्याने सुरु करण्यात येणार आहे. ज्येष्ठांची सुरक्षा हा एकच मुद्दा नाही तर त्यांना अनेक समस्या भेडसावतात.

घरात मन मोकळे करण्यासाठी दुसरे कोणीही नसल्यामुळे अनेकदा ज्येष्ठांना एकटेपणाची जाणीव होते. अशा वेळी ज्येष्ठांच्या घरी पोलीस जातील आणि त्यांच्या समस्या जाणून घेतील. ज्या समस्या पोलिसांकडून सुटू शकतील, त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. आरोग्य विषयक समस्या असतील तर, त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी मदत करणे, अशी कामे करण्यात येणार आहेत. ठाणे शहरात विशेषत: जुन्या ठाण्यात मोठ्याप्रमाणात जेष्ठ नागरिक वास्तव्य करतात. त्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये एकटे राहणारे महिला, पुरूष आणि एकत्र राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांची माहिती गोळा केली जाणार आहे. अनेकदा कामानिमित्त मुले बाहेरगावी जातात. त्यांचे वयोवृद्ध आई-वडील मात्र इथे घरी एकटेच असतात. त्यांचा सांभाळ करण्यासाठी मदतनीस (केअर टेकर) ठेवले जातात. पण, काही वेळेस मदतनीसांकडूनच गून्हे घडतात. अशा मदतनीसांची माहिती देखील गोळा केली जाणार आहे. नागरिकांना मदत क्रमांक दिला जाणार असून यामुळे पोलिसांचा थेट संपर्क जेष्ठ नागरिकांसोबत राहणार आहे.

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कशी दुर करणार?

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक रस्ते रुंद करण्यात आलेले आहेत. काही रस्त्यांचे नुतनीकरण करण्यात आले आहे. शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड तसेच नोकरदार वर्गाच्या वाहनांची वाहतूक सुरू असते. यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी काही ठिकाणी वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. तरीही काही ठिकाणी कोंडीची समस्या कायम आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिका, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ या विभागांसोबत एक समिती तयार करण्याचे विचाराधिन आहे. या समितीच्या माध्यमातून स्थानिक नागरिक, वाहतूक तज्ञ यांच्याशी देखील संवाद साधला जाईल.

अमली पदार्थ आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार?

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. तसेच सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवून कारवाई करण्यात येत आहे. अमली पदार्थ सेवन करू नये आणि सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात नागरिक अडकू नयेत यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. शाळामध्ये सायबर सुरक्षा या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शाळेतील मुलींकरता स्वतंत्ररित्या ‘गुड टच आणि बड टच’ या विषयावरही व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे.

हेही वाचा : नव्या पोलीस आयुक्तांचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना दट्ट्या; पोलीस ठाण्यात नागरिकांना मिळाणाऱ्या वागणुकीचा आयुक्त घेतात थेट आढावा

मदत कक्ष योजना कशी असेल?

ठाणे पोलीस आयुक्तलयात पोलिसांची सल्ला मसलत न करता थेट ‘स्वयं तक्रार मंचा’च्या (सेल्फ हेल्प डेस्क) माध्यमातून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कल्याण, डोंबिवलीतील रामनगर, विष्णुनगर, मानपाडा, टिळकनगर, बाजारपेठ, महात्मा फुले, कोळसेवाडी, खडकपाडा या आठ पोलीस ठाण्यांमध्ये ही प्रायोगिक तत्वावर सुविधा सुरू करण्यात आली आहे. कल्याण मधील हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला तर तो संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयात राबविला जाईल. सायबर विषयक, मोबाईल हरविले, चोरी संबंधी तक्रारी, चारित्र्य पडताळणी अर्ज, ठाणे पोलीस आयुक्तालयासंबंधी माहिती, गुन्ह्याचे प्रथम माहिती अहवाल पाहाणे, अशी सुविधा ‘स्वयं तक्रार मंचा’ माध्यमातून मिळत आहे. अशिक्षित व्यक्तिंना या सुविधेचा वापर करता आला पाहिजे म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात या सुविधेचे संबंधितांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित पोलीस मंचासमोर तैनात करण्यात येणार आहेत.

Story img Loader