‘एमएसआरडीसी’च्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात
कल्याण-शिळफाटा रस्त्याचे नियंत्रक असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’ने निळजे पुलाच्या डागडुजीच्या कामासाठी लागणारा सुमारे १५ लाखाचा भरणा रेल्वेच्या बांधकाम विभागाकडे केलेला नाही. त्यामुळे रेल्वेच्या बांधकाम विभागाने या पुलाचे काम लांबणीवर टाकले आहे. कल्याण-शीळ वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या उड्डाणपुलाची डागडुजी होत नसल्याने येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे.
कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक या पुलाच्या कामासाठी एक महिना बंद ठेवली जाणार आहे, असा फतवा मध्यंतरी वाहतूक पोलीस आणि बांधकाम विभागामार्फत काढण्यात आला. निळजे पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत काटई एमआयडीसी जलवाहिनीमार्गे खोणी गावाजवळून तळोजा रस्त्याने वाहनचालकांना नवी मुंबई, मुंबईचा रस्ता धरावा लागणार आहे. यामुळे साधारणपणे पाऊण तासाचा फेरा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्ती लवकर करण्यात यावी, अशी वाहनचालक तसेच प्रवाशांची मागणी आहे.
असे असले तरी, पुलाच्या डागडुजीचे काम निधीमुळे रखडण्याची शक्यता आहे. रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या या पुलाच्या रेल्वेमार्गावरील भागाची डागडुजी रेल्वेच्या बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहे. त्यासाठी महामंडळाकडून रेल्वेला १४ ते १५ लाख रुपयांचा भरणा करणे आवश्यक होते. परंतु, निधी भरण्याची मुदत दोन वेळा संपूनदेखील महामंडळाने अद्याप निधी भरलेला नाही. दुसरीकडे, डागडुजीच्या कामासाठी निधीचा भरणा होत नाही तोपर्यंत काम सुरू करण्यात येणार नाही, असे रेल्वेने म्हटले आहे.
दरम्यान, ‘पुलाच्या स्लॅबचा भाग कोसळल्याने हे डागडुजीचे काम हाती घेण्यात येत आहे. निळजे उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम रेल्वे करणार आहे. काम हाती घेण्यात येईल,’ असे रेल्वेचे वरिष्ठ अभियंता संजय नवाथे यांनी स्पष्ट केले. तर रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भोंडे यांनी, ‘वाहतूक नियोजन व इतर कामे पूर्ण झाली की तातडीने हे काम हाती घेण्यात येईल,’ असे सांगितले.

Story img Loader