ठाणे : महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी ठरवून देण्यात आलेल्या मुदतीत काम पुर्ण करीत नसलेल्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा मिळाला नाहीतर, संबंधितांवर वेळप्रसंगी कारवाई करावी, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना सोमवारी पाहाणी दौऱ्यादरम्यान दिले. कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देत, जे अधिकारी चांगले काम करतील, त्यांचा सत्कार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते नुतनीकरण, पावसाळ्यापुर्वीची नालेसफाई आणि मलनिस्सारण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामांचा सोमवारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहाणी दौरा केला. पोखरण रस्ता क्रमांक दोन वरील कानवुड चौकातून पाहाणी दौऱ्याला सुरूवात केली. या चौकाच्या परिसरात मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. या कामाची पाहाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू असून हे काम अद्याप पुर्ण का झालेले नाही. या कामासाठी किती दिवसांची मुदत देण्यात आली होती. हे काम बंद का होते आणि आम्ही येणार म्हणून काम पुन्हा सुरू केले का, असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
हेही वाचा >>> डोंबिवली जवळील शिरढोणमध्ये शेतकऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
या कामाबाबत अधिकाऱ्यांना मात्र कोणतेही ठोस स्पष्टीकरण देता आले नाही. अपुर्णवस्थेत असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या मुद्द्यावरून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. याच दरम्यान, संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामे सुरू आहेत. ही कामे पुर्ण करण्यासाठी ठेकेदाराला मुदत ठरवून देण्यात आली आहे. या मुदतीत कामे पुर्ण करीत नसलेल्या ठेकेदारांसह अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा मिळाला नाहीतर, संबंधितांवर वेळप्रसंगी कारवाई करावी, असे आदेश त्यांनी बांगर यांना यावेळी दिले.
हेही वाचा >>> ठाण्यात सुरक्षा साहित्यविनाच कामगार करत आहेत नालेसफाई
कंत्राटदारावर कारवाईचे आदेश
ठाणे शहरातील टिकूजीनी वाडी सर्कल येथे डांबरी रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी केली. यावेळी कंत्राटदाराने कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने, हात मौजे आणि शिरस्त्राण दिलेले नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. याप्रकरणाची त्यांनी तातडीने दखल घेऊन कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. रस्त्यांची कामे होणे हे जितके महत्वाचे आहे, तेवढेच ते बनवणारे कामगार सुरक्षित राहणे महत्वाचे असल्याचे सांगत त्यांनी कंत्राटदाराला खडसावले आणि कामगारांना तात्काळ ही सामुग्री देण्यास सांगितले.
आयुक्तांनी झापले
कानवुड चौकातील मल निस्सारण प्रकल्पाच्या काम ठरवून दिलेल्या वेळेत पुर्ण का होऊ शकले नाही, याचे उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही. त्यातच संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला समोर उभे करून त्याला कामाच्या दिरंगाईबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले. यावरून पालिका आयुक्त बांगर यांनीही त्या अधिकाऱ्याला झापले आणि कामाची जबाबदारी तुमचीच असल्याचे सांगितले.
जितेंद्र आव्हाडांना टोला
हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. सर्व सामान्य जनतेसाठी आम्ही कामे करित आहोत. ठाण्यात सुरु असलेल्या नाले सफाई आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यासाठी आलो आहे. गरिबांची आणि सर्वसामान्यांची जाण आम्हाला आहे. तसेच सर्व सामान्य माणसाला सुलभ आणि चांगल्या दर्जाची घरे क्लस्टरच्या माध्यमातून मिळतील याचे नियोजन सरकार करेल, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.