ठाणे – दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणानिमित्ताने ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी कपडे, कंदील, विद्युत दिवे, रांगोळी आणि दिवाळी साहित्य खरेदीसाठी शनिवार सकाळपासूनच गर्दी केली होती. यामुळे गोखले रोड, राम मारुती रोड, जांभळी नाका, ठाणे स्थानक परिसरातील मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. या कोंडीमुळे नागरिकांना दहा मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी २० ते २५ मिनीटाचा कालावधी लागत आहे. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होताना दिसून आली.
सोमवारपासून दिवाळी सणाला सुरूवात होणार आहे. दिवाळी सणाकरिता नागरिक कपडे, कंदील, विद्युत दिवे, पणत्या, रांगोळी असे साहित्य खरेदी करतात. यामुळे दिवाळीच्या पंधरा दिवस आधीपासूनच दिवाळी साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत येते आणि त्याठिकाणी नागरिक खरेदीसाठी गर्दी करताना दिसून येतात. हेच चित्र ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील गोखले रोड, राम मारुती रोड, जांभळी नाका, ठाणे स्थानक परिसरातील बाजारपेठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. यंदाही दिवाळीनिमित्त आकाश कंदील, विद्यूत माळा, पणत्या, रांगोळी, सजावटीचे साहित्य, कपडे अशा विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. तर, व्यापाऱ्यांनी देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांबाहेर विद्यूत रोषणाई तसेच सजावट केली आहे. शहरातील रस्तेही विद्यूत रोषणाईने उजळून निघाले आहेत. या विद्युत रोषणाईमुळे तसेच दुकानांची सजावट पाहून नागरिकांचा खरेदीसाठी उत्साह वाढला आहे.
हेही वाचा – ठाणे, पालघरमध्ये शिंदे यांची भिस्त आयात उमेदवारांवर ?
हेही वाचा – फराळाचे साहित्य महागले
सराफ, इलेक्ट्राॅनिक वस्तू, वाहन, कपडे या दुकानांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रसन्न वाटावे यासाठी फुलांची आरास करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंच्या खरेदीवर विशेष सवलती देखील देण्यात आल्या आहेत. दिवाळी सणाच्या आधी आलेल्या शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याचे चित्र दरवर्षी दिसून येते. यंदाही हे चित्र कायम असून शनिवार सकाळपासूनच गोखले रोड, राम मारुती रोड, जांभळी नाका, ठाणे स्थानक परिसरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे या मार्गांवर वाहनांचा भार वाढला. या मार्गावरून स्थानक परिसरातील बस वाहतूक सुरू असते. तसेच या भागातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यातच या रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी वाहने उभी करण्यात आली होती. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली होती. यात, टीएमटी गाड्या तसेच रिक्षा देखील अडकून पडल्या होत्या. या कोंडीचा फटका कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनाही बसला. या कोंडीमुळे नागरिकांना दहा मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागत होता. तसेच घोडबंदर, कापुरबावडी – माजिवडा, साकेत, बाळकुम अशा विविध भागांत देखील मोठ्याप्रमाणात शनिवारी सकाळी कोंडी झाल्याचे दिसून आले.