ठाणे : रिक्षातील इलेक्ट्रॉनिक मीटरमध्येही फेरफार करून प्रवाशांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. गेल्या महिन्यात मुंबईत घडलेल्या घटनेची एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. अशाच प्रकरणांमध्ये गेल्या महिन्याभरात ठाणे उपप्रादेशिक विभागाकडे तीन तक्रारी दाखल झाल्या असून त्याची दखल घेत परिवहन विभागाने रिक्षाचालकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड आकारला.
रिक्षा प्रवासात अनेकदा प्रवाशांना चालकांच्या मुजोरीचा सामना करावा लागतो. काही वेळा मीटर वाढवण्यासाठी चुकीच्या किंवा लांब अंतरावरून रिक्षा घेऊन जाणे कमी अंतरासाठी अधिकचे भाडे आकारणे, अकारण वितंडवादांना प्रवाशांना सामोरे जावे लागत असते. ऑक्टोबरमध्ये मुंबईत यासंदर्भातील एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. असाच प्रकार आता ठाणे शहरातही सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांत ऑक्टोबरमध्ये ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तीन तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर रिक्षाचालकांवर कारवाई केली. बाळकुम ते कापुरबावडी २३ रुपये मीटर होते, मात्र फेरफारीमुळे ४० रुपये होत असल्याचे प्रिया पार्टे म्हणाल्या.
हेही वाचा – कल्याणमध्ये रस्ता अडवून मातीच्या कुंडी विकणाऱ्यावर गुन्हा दाखल
मीटर फेरफार असे…
मीटरचा वेग वाढवण्यासाठी रिक्षाच्या हँडलमागे असलेले बटण रिक्षाचालकाने सुरू केल्यास मीटरचा वेग वाढतो. तर बंद केल्यास मीटरचा वेग पूर्ववत होतो. अशा वेळी चालकाने बटण सुरू करताच मीटरवरील शेवटच्या आकड्यानंतर एक छोटा पॉइंट बंद-चालू (ब्लिंक) होताना दिसतो. मीटरवर २३.०० सहसा असे मीटर भाडे दिसते, परंतु बटणाच्या साह्याने चालकाने त्यात फेरफार केल्यास मीटरवर दिसणाऱ्या रकमेच्या म्हणजेच २३.०० या रकमेच्या शेवटी एक पॉइंट दिसतो. म्हणजेच ही रक्कम मीटरवर २३.००. अशी दिसेल. असे आढळल्यास नागरिकांनी संबंधित रिक्षाचालकाची तक्रार त्याच्या रिक्षाच्या क्रमांकासहित जवळच्या प्रादेशिक विभागामध्ये करावी, असे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले.
मीटर वाढवण्यासाठी चुकीच्या किंवा लांब अंतरावरून रिक्षा घेऊन जाणे कमी अंतरासाठी अधिकचे भाडे आकारणे, अकारण वितंडवादांना प्रवाशांना सामोरे जावे लागत असते.
मीटरच्या संदर्भात काही संशयित आढळल्यास वा चालक भाडे जास्तीचे घेत असल्यास ९४२०४७३९६९ या क्रमांकावर वा mh04 rikshawcomplaint@gmail. com या मेल आयडीवर संपर्क साधावा. – हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी