ठाणे : दुभाजक बसवून केलेले वाहतूक बदल, मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची सुरु असलेली कामे, वेळी-अवेळी नियम डावलून होत असलेली अवजड वाहनांची वाहतूक आणि कापूरबावडी उड्डाणपुलाच्या दुरुस्ती यामुळे माजिवडा-घोडबंदर प्रवास ठाणेकरांना नकोसा झाला आहे. घोडबंदरला जाण्यासाठी वाहन चालक पर्यायी मार्गांचा वापर करू लागले आहेत. परंतु येथेही कोंडी होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून माजिवडा ओळखला जातो. ठाणे रेल्वे स्थानक, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गावरील सर्व वाहने घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी माजिवडा चौकातून वाहतूक करत असतात. वाहनांचा भार वाढल्याने ठाणे महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या मदतीने माजिवडा, कापूरबावडी चौकात दुभाजक बसविले आहेत. पंरतु दुभाजक बसविल्याने कोंडी होत असल्याचा आरोप काही वाहन चालक आणि प्रवासी करत आहेत. तर दुसरीकडे कापूरबावडी चौकात अर्धा रस्ता व्यापून मेट्रो मार्गिकेच्या खांबाची उभारणी केली जात आहे. मुंबई नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या कापूरबावडी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहेत. अवेळी सुटणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळेही आता कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या सर्वांचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागला आहे. दररोज सकाळी हिरानंदानी इस्टेट ते माजिवडा हे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे एक तास लागत आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काही वाहन चालकांनी पर्यायी रस्त्यांची निवड केली आहे. परंतु येथेही अरुंद रस्ते आणि अतिक्रमणांमुळे कोंडीचे चित्र दिसून येत आहे. या वाहतुक कोंडीमुळे वाहन चालक आणि प्रवाशांच्या नाकी नऊ आले आहेत.

हेही वाचा – टिटवाळ्यात रिक्षाचालकाने केली पत्नीची हत्या

माजीवडा चौकातील कोंडीचा फटका शहरातील अंतर्गत भागांनाही बसू लागला आहे. सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत माजीवडा चौक ओलांडणे हे वाहन चालकांसाठी जिकरीचे ठरू लागले आहे. सायंकाळच्या वेळेत कामावरुन परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी या चौकात होत असते. चौकात होणाऱ्या या कोंडीमुळे पूर्व द्रुतगती महामार्ग, साकेतच्या दिशेने जाणारा रस्ता तसेच नाशीककडून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी होऊ लागली आहे. वाहतूक पोलिसांचे जथ्थे या भागात उभे असतात. तरीही ही कोंडी सोडविताना या पथकाच्या नाकीनऊ येत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

हेही वाचा – ठाण्यात हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाणीचा प्रयत्न; महापालिकेचा कर्मचारी ताब्यात

कापूरबावडी चौकाजवळ मेट्रो खांबाच्या निर्माणाचे काम केले जात आहे. तसेच उड्डाणपुलाची दुरुस्ती केली जात आहे. या कामांमुळे कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कर्मचारी तैनात असतात. – डाॅ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane people disturbed by majiwada ghodbunder journey ssb
Show comments