ठाणे : मिरा रोड येथील नयानगर भागात दोन गटांमध्ये हिंसाचार उफाळला होता. या घटनेनंतर ठाणे शहर पोलीसदेखील सतर्क झाले असून पोलिसांची समाजमाध्यमावर करडी नजर आहे. समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात पोलिसांनी थेट गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, बुधवारी रात्री मुंब्रा येथील एका १९ वर्षीय मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नयानगर भागात काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये हिंसाचार उफाळला होता. या घटनेनंतर समाजमाध्यमांवर मोठ्याप्रमाणात धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश समाजकंटकांकडून प्रसारित केले जात आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर नयानगर भाग आहे. हा हिंसाचार ठाणे शहरात घडू नये यासाठी ठाणे पोलिसांकडून आता समाजमाध्यमांवर लक्ष ठेवले जात आहे.
हेही वाचा – मुंब्रा येथे बॅनर फाडल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण
हेही वाचा – ठाणे: पोलीस अधिकाऱ्याचा न्यायालयात मृत्यु
मुंब्रा येथील एका १९ वर्षीय मुलाने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावरून धार्मिक तेढ निर्माण करणारा एक संदेश प्रसारित केला होता. याची पडताळणी पोलिसांनी केल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात पोलिसांनीच मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कलम २९५ अ आणि १५३ अ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.