ठाणे : ठाणे पोलिसांच्या हाती काही दिवसांपूर्वी एक निनावी पत्र आले. या पत्रामध्ये एका मुलीचे छायाचित्र होते. या मुलीची हत्या करून तिला मुस्लिम समाजाच्या दफनभूमित पुरण्यात आल्याचे त्यामध्ये म्हटले होते. पोलिसांच्या पथकाने गांभीर्याने याप्रकरणाचा तपास सुरू करून दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला. मृत मुलीच्या डोक्यावर कापलेल्या जखमा आढळून आल्या. हा हत्येचा प्रकार असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांना अटक केली आहे. त्यांच्या आणखी एका मुलीची जीभ कापण्यात आली असून तिच्या देखील डोक्यावर जखमा होत्या. दीड वर्षांच्या मुलीच्या हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे हा प्रकार अंश्रद्धेचा असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंब्रा येथील शिवाजी नगर भागात मुलगी तिचे वडिल जाहीद शेख (३८), आई नूरानी, दोन भाऊ आणि दोन बहिणींसोबत राहात होती. १८ मार्चला तिचे आई-वडिल तिला मुंब्रा येथील एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तिच्या डोक्याच्या मागील बाजूस, टाळूवर डॉक्टरांना कापल्याच्या काही जखमा आढळून आल्या. या बाबत डॉक्टरांनी तिच्या आई-वडिलांना विचारले असता, त्यांच्याकडून घरामध्ये काही लागल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा…ठाणे : उथळसर, नौपाड्यातील काही भागात सोमवारी पाणी नाही

डॉक्टरांना त्यांचे म्हणणे पटत नव्हते. त्यानंतर संबंधित डॉक्टरांनी त्या मुलीच्या डोक्याला प्राथमिक उपचार करून तिला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तिच्या आई-वडिलांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात नेले असता, तिथे तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिच्या डोक्याला लावण्यात आलेली पट्टी काढण्यास सांगितले. परंतु पालकांनी त्यास नकार दिला. तिच्या मृत्यूनंतर डॉक्टरांचे प्रमाणपत्र त्यांना मिळाले. प्रमाणपत्र दफनभूमित दाखवून त्यांनी मुलीचे प्रेत दफन केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक या कार्यालयात एक पत्र आले. या पत्रामध्ये एका मुलीचे छायाचित्र होते. या मुलीची हत्या करून तिला मुस्लिम समाजाच्या दफनभूमित पुरण्यात आल्याचे म्हटले होते. पोलिसांनी संबंधित पत्रावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. परंतु तो मोबाईल क्रमांक बंद होता. तसेच निवासाचा पत्ता देखील होता. हा पत्ता देखील खोटा होता. असे असले तरी छायाचित्र असल्याने मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू केला.

हेही वाचा…वाढदिवसाच्या निमित्ताने संजीव नाईक यांची मतपेरणी

पोलिसांनी तहसिलदारांना पत्रव्यवहार करून दफन भूमित पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला. त्यावेळी मुलीच्या डोक्यावर पोलिसांना जखमा आढळून आल्या. पोलिसांनी तात्काळ मुलीच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणात त्यांना अटक केली आहे. त्यांनी मुलीची हत्या का केली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा…डोंबिवलीजवळील निळजे गावात मयत व्यक्तीच्या नावाने जमिनीचा ११ कोटीचा मोबदला लाटला

शेख हा मूळचा झारखंड येथील आहे. काही महिन्यांपूर्वीच तो भाड्याने मुंब्रा येथे राहण्यास आला आहे. त्याच्या एका मुलीची जीभ कापलेल्या अवस्थेत आहे. तसेच डोक्यावर जखमा होत्या अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे या मुलीसोबत देखील असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता का, यादिशेने पोलीस तपास सुरू आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane police arrest parents from mumbra for allegedly murdering one and a half year old daughter investigation underway psg