ठाणे : बोलण्यात गुंतवून अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनीटने अटक केली असून त्यांच्याकडून ठाणे आणि मुंबई परिसरातील एकूण १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. अशा स्वरुपाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात दोघांना यापुर्वी सुद्धा अटक झाली होती आणि तीन महिन्यांपुर्वी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा असे गुन्हे करण्यास सुरूवात केली होती, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल कृष्णा शेट्टी (४३) आणि रमेश विजयकुमार जयस्वाल (४७) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे अंबरनाथ तालुक्यातील भालगाव परिसरात राहतात. ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरातील बाजारपेठ, सार्वजनिक रस्ता अशा ठिकाणी नागरिकांना बोलण्यात गुंतवून भामटे त्यांच्याकडील दागिने लंपास करीत असल्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. याप्रकरणी नौपाडा, उल्हासनगर, बदलापुर पुर्व, शिवाजीनगर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी, महात्मा फुले चौक, डोंबिवली तसेच जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा…ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच

परंतु आरोपी गुन्ह्याची आणि राहण्याची जागा सातत्याने बदलत असल्यामुळे त्यांना पकडणे शक्य होत नव्हते. या प्रकरणाचा संमातर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनीटचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कोळी यांच्या पथकाने सुरू केला होता. या पथकाने तपास करून अनिल आणि रमेश या दोघांना अटक केली. या दोघांनी ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ११ तर, मुंबई शहरात ६ असे एकूण १६ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. ठाणे पोलिस आयुक्तालयात केलेल्या ११ गुन्ह्यातील १७ लाख २८ हजारांचा ऐवज दोघांक़डून जप्त करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.