ठाणे : ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या दलाल महिलेस अटक केली आहे. पोलिसांनी तिच्या तावडीतून दोन बळीत मुलींची सुटका केली आहे. महिलेविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक परिस्थिती वाईट झाल्याने वेश्या व्यवसाय चालवित असल्याचे अटकेत असलेल्या महिलेने सांगितले.

शिळफाटा भागातील एका गृहसंकुलात दलाल महिला राहते. ही महिला ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील एका हॉटेलमध्ये दोन महिलांना घेऊन येणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी एक पथक स्थापन केले.

त्यानुसार, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक डी. व्ही. चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक एन.डी. क्षिरसागर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा कदम, डी.के. वालगुडे, पोलीस हवालदार के.बी. पाटील, व्ही.आर. पाटील, आर.यु. सुवारे, महिला पोलीस अंमलदार पी.जी. खरात, एच.आर. थोरात, यु.एम. घाडगे यांच्या पथकांनी मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सापळा रचून पथकाने हॉटेलमध्ये दलाल महिलेला ताब्यात घेतले. तसेच तिच्या तावडीतून दोन महिलांची सुटका केली.

तिच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिलेची चौकशी केली असता, पतीच्या निधनानंतर आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने ती वेश्या व्यवसायत पडल्याचे सांगितले. ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर भागात ती वेश्या व्यवसाय चालवित असल्याचे चौकशीत समोर आले. याप्रकरणात पोलिसांनी तिलाअटक केली आहे.