ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात बुधवारी रात्री गटारीनिमित्ताने मद्याच्या पार्ट्या झोडून वाहने चालविणारे तळीराम आणि त्यांच्यासोबत असलेल्या सह प्रवाशी अशा एकूण ११४ जणांची पोलिसांनी झिंग उतरवली आहे. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागानेही जिल्ह्यात धाडी टाकून हातभट्टीचे मद्य तयार करणाऱ्यांविरोधात एकूण १२ गुन्हा दाखल केले आहेत. या गुन्ह्यात सहा जणांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रावण महिना सुरु होण्याच्या आठवडाभर आधी गटारीनिमित्ताने पार्ट्यांचे आयोजन केले जाते. ठाणे जिल्ह्यातील धबधबे, नद्या, हाॅटेल, शेतघरांमध्ये अशा पार्ट्यांचे बेत आखले जातात. याठिकाणी ठाणे शहरासह मुंबई आणि उपनगरांमधील नागरिक येतात. या पार्ट्यांमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर अनेकजण स्वत: वाहने चालवित घरी जातात. नशेत असल्यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची भिती असते. या प्रकारामुळे मद्यपी चालकासह इतरांचेही जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांकडून गटारीच्या दिवशी सर्वच प्रमुख चौकात मद्यपी तपासणी मोहिम राबविण्यात येते. यंदाही बुधवारी गटारीनिमित्ताने ठाणे पोलिसांनी अशीच मोहिम राबविली. या मोहिमेसाठी ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुर या शहरातील चौकात वाहतूक पोलिसांची पथके नाकाबंदी करून वाहनचालकांची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी करत होते.

बुधवारी सायंकाळी ७ वाजेपासून या शहरांच्या मुख्य रस्त्यांवर आणि पर्यटनास्थळांजवळील रस्त्यांवर नाकाबंदी सुरू केली होती. त्यात मद्यपी वाहन चालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहप्रवाशी अशा एकूण ११४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ८५ मद्यपी वाहन चालक असून २९ जण सहप्रवासी आहेत. सर्वाधिक कारवाई ही ठाणे आणि कळवा शहरात करण्यात आली. ठाणे ते कळवा शहरात ३१, कल्याण-डोंबिवली २६, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरांत १८ आणि भिवंडीत १० जणांवर कारवाई करण्यात आली. तर, ठाणे, कळवा शहरात १७, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरांत सहा, भिवंडीत चार आणि कल्याण-डोंबविली क्षेत्रात दोन सह प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये खाडी पात्रात छुप्या पद्धतीने हातभट्टीचे मद्य तयार करून त्याची विक्री केली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाने जिल्ह्यातील अशा हातभट्टीच्या ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत पथकाने गावठी मद्य तसेच रसायनाचा एकूण १० लाख ८४ हजार ८९० रुपये किमतीचा साठा जप्त केला. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने १२ गुन्हे दाखल केले असून सहाजणांना अटक केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane police arrested 114 drinker along with the co passengers amy