ठाणे : उत्तर प्रदेश येथून ठाण्यातील नातेवाईकांकडे काही दिवस राहण्यासाठी येऊन याच काळात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचण्याचे गुन्हे करणाऱ्या दोन जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी मुंबई, ठाणे आणि कल्याण परिसरात जबरी चोरीचे ११ गुन्हे केल्याची बाब उघडकीस आली असून या गुन्ह्यातील १० लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिष कल्याण सिंग (३३) आणि अमितकुमार राकेश सिंग (२६) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे मुळचे उत्तरप्रदेश येथील आग्रा जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. हे दोघे ठाणे येथील सावरकरनगर भागातील नातेवाईकांकडे काही दिवस राहण्यासाठी यायचे आणि याच काळात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पोबारा करायचे, अशी माहिती वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली.

हेही वाचा – ठाणे : तीन जखमी रुग्णांची भर पावसात दोन किलोमीटर झोळीतून वाहतूक, शहापूर मधील घटना

चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी खेचून पोबारा केला होता. चितळसर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे यांच्या पथकाने त्याचा तपास सुरू केला होता. यामध्ये घटनास्थळावरून आरोपी ज्या दिशेने पळून गेला, त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पाहाणी केली. त्याआधारे पथकाने आशिष सिंग याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यात त्याने जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली देऊन अमितकुमार सिंगच्या मदतीने हे गुन्हे करत असल्याची माहिती पथकाला दिली. त्यानुसार पथकाने अमितकुमारचा शोध घेऊन त्याला बोरिवली येथून अटक केली. त्याचा साथीदार रोहित उर्फ विशाल हा फरार असून त्याचा पथकाकडून शोध सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – महिलेवर सामूहिक बलात्कार करुन हत्या, तीन आरोपींना अटक

११ गुन्हे उघडकीस

मुंबई, ठाणे आणि कल्याण परिसरात दोघांनी जबरी चोरीचे ११ गुन्हे केल्याची बाब उघडकीस आली आहे. यामध्ये चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३, कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २, कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १, खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३, नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १, गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात आरोपींनी चोरलेले १२२ ग्रॅम वजनाचे ८ लाख ५४ हजार रुपये किंमतीचे दागिने आणि दोन दुचाकी असा १० लाख १४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane police arrested two people who used to come to relatives in thane from uttar pradesh and steal jewellery ssb