ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुन्हेगारी, वाहतुक कोंडी आणि गटातटातील वादावर वचक ठेवण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुकानाबाहेरील, घराबाहेरील, रस्त्यालगत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे नियंत्रण थेट पोलीस नियंत्रण कक्षात घेतले आहे. या उपक्रमाचा चांगला परिणाम दिसणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या एक हजार १२१ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण या कक्षातून होत असून येत्या कालावधीत आणखी साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रण कक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे.
ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रात भिवंडी तालुका, गणेशपुरी, पडघा कल्याण तालुका, कसारा, किन्हवली, कुळगाव, मुरबाड, शहापूर, टोकवडे आणि वाशिंद पोलीस ठाणे येतात. तसेच मुंबई नाशिक महामार्ग, वाडा भिवंडी रस्ता, मुरबाड असे महत्त्वाचे मार्ग ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून जातात. ग्रामीण पोलिसांची हद्द ही विस्तीर्ण असून गाव पाड्यांची संख्या देखील अधिक आहे. या भागात सुमारे साडेचार हजार खासगी आणि सरकारी योजनेतून बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. अनेकदा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या सोनसाखळ्या चोरीचे प्रकरण घडतात. तसेच एखादी हत्या झाल्यानंतर महामार्गालगत मृतदेह फेकणे, दोन गटामध्ये वादाचे प्रसंग असे प्रकार देखील होतात.
या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी ‘एक कॅमेरा आपल्या सुरक्षेसाठी’ हा उपक्रम हाती घेतला होता. संबंधित पोलीस अधिकारी गावातील सरपंच, सराफा दुकानदार, नागरिकांची भेट घेऊन या उपक्रमाची माहिती नागरिकांना देत होते. त्यानंतर नागरिकांनी आणि दुकानदारांनी त्यांच्या दुकानाबाहेरील किंवा घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस नियंत्रण कक्षासोबत जोडण्यास सहमती दर्शविली. तसेच पेट्रोल पंप, शाळा, उपाहरगृह, हाॅटेल येथील माहिती घेतली जात होती. येथील सीसीटीव्ही कॅमेरे देखील नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. आतापर्यंत एक हजार १२१ कॅमेरे तांत्रिकरित्या नियंत्रण कक्षात जोडण्यात आले आहेत. या उपक्रमाचे लोकार्पण कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते झाले. दररोज २४ तास हे नियंत्रण कक्ष सुरू राहणार असून यामध्ये पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सीसीटीव्हींची पाहणी करणार आहेत.
या कॅमेऱ्यांमुळे जनतेला मदत होणार आहे. तसेच वाहतुक कोंडी, गुन्ह्यांचा तपास, महिला सुरक्षा, संशयास्पद हालचालींवर लक्ष, कायदा सुव्यवस्था इतर महत्त्वाच्या बाबींवर लक्ष ठेवता येणार आहे. – डाॅ. डी.एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण.
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार सात कलमी कार्यक्रमांतर्गत दिलेल्या उद्धिष्टांप्रमाणे एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षेसाठी असा उपक्रम सुरू झालेला आहे. येत्या काही दिवसांत इतर क्षेत्रातही असा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे. – संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र.