शहरात सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात होत असलेली वाढ ही गंभीर बाब आहे. यासाठी पोलीस दल कोणतेही उपाय हाती घेत नसल्याने ते टीकेचे धनी ठरत आहेत. त्यामुळे या विरोधात कडक पावले उचलण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे वृत्त आहे. सोनसाखळी चोरीसारखे गुन्हे का वाढत आहेत, याचा तपास करा आणि चोरांच्या मुसक्या आवळा, असे कांबळे यांनी स्पष्ट केल्याचे समजते. सोनसाखळी चोरांचा माग काढण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सोनसाखळी चोरीचे गुन्हे वाढू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दिवसाला पाच ते सहा सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडू लागले आहेत. याबाबत गेल्या शुक्रवारी ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये विस्तृत आढावा घेण्यात आला होता. या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच सोनसाखळी चोरीच्या वाढत्या गुन्ह्य़ांना पायबंद घालण्यासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय शहरात गस्त वाढवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या.

सोनसाखळी चोरीच्या वाढत्या गुन्ह्य़ांना पायबंद घालण्यासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय, सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात सराईत गुन्हेगार आहेत. यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्याचे; तसेच अशा गुन्हेगारांना ‘मोक्कां’तर्गत कारवाई करता येऊ शकते का, या संबंधी चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शहरात गस्त वाढवणे आणि नाकाबंदीत वाढ करण्यात आली आहे.     
– विजय कांबळे, पोलीस आयुक्त, ठाणे</strong>

Story img Loader